बीएसएनएलच्या २१ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर, सीबीआयने २५ ठिकाणी टाकले छापे

पुणे १७ जून २०२३: सीबीआयने बीएसएनएलच्या २१ अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या २१ अधिकाऱ्यांमध्ये एका महाव्यवस्थापकाचाही समावेश आहे. तपास यंत्रणेने या संदर्भात २५ ठिकाणी छापे टाकले असुन तपास यंत्रणेच्या आरोपानुसार, या अधिकाऱ्यांनी बीएसएनएलची फसवणूक करण्यासाठी एका ठेकेदारासोबत कट रचला.

फसवणुकीच्या या प्रकरणात, सीबीआयने बीएसएनएल आसाम सर्कलच्या अधिकार्‍यांसह माजी महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक आणि जोरहाट, सिबसागर, गुवाहाटी व इतर ठिकाणच्या मुख्य लेखा अधिकारी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. एफआयआरमध्ये एका खासगी व्यक्तीचेही नाव असल्याचे तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीबीआयच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटदाराला ओपन ट्रेंचिंग पद्धतीने ९०,००० रुपये प्रति किलोमीटर दराने, राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क केबल टाकण्याचे कंत्राट देण्यात आले होते. करारातील अटींमध्ये फेरफार केल्याने बीएसएनएलचे सुमारे २२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि हरियाणामधील आरोपींच्या कार्यालये व घरांसह एकूण २५ ठिकाणी छापे टाकले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी-सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा