नंदूरबार १८ जून २०२३: नंदूरबार जिल्ह्यातील पाऊस लांबल्याने मागील महिन्यात लागवड करण्यात आलेले कापसाचे पीक धोक्यात आलय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. वाढते तापमान आणि पाण्याच्या कमतरतेमुळे कपाशीची कोवळी रोपे करपतायत, वरुणराजा कधी बरसणार याकडे बळीराजा वाट पाहत आहे.
शेतकरी आधीच संकटात आहे, त्यातच वरुणराजा कधी बरसणार या विवंचनेने शेतकरी वर्ग आभाळाकडे डोळे लावून बसलाय. बळीराजा पुन्हा संकटात सापडतो का काय? अशी परिस्थिती निर्माण झालीय. शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याला भाव मिळत नाही, शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वाशिम जिल्ह्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने जिल्ह्यात पेरणीला उशीर होतोय. खरीप हंगामातील पेरणीसाठी संपूर्ण तयारीनिशी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांची चिंता यामुळे वाढलीये. १७ जून अखेर जिल्ह्यात कुठेही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. मागील वर्षीपासून कापसाचे भाव पडल्यामुळे उत्पादन झालेला कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये साठवून ठेवलाय.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मान्सून ११ जून पर्यंत सक्रिय होईल, त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करून पेरणीची तयारी केली होती. परंतु आज १८ तारीख आली तरीही वरुणराजा शेतकऱ्यावर रुसलेलाच पाहायला मिळत आहे.
न्यूज अन कट प्रतिनिधी – अनिल खळदकर