मुंबई १८ जून २०२३: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा नेहमीचा चर्चेचा विषय, कर्मचारी सोयीस्कर ठिकाणी बदली मिळावी म्हणून वशील्यासह सर्व हातखंडे वापरतो. या सर्व गोष्टीमध्ये माहीर असलेले कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी डेरा टाकून बसतात. परंतु आता बदल्यामध्ये हस्तक्षेपाला चाप लावण्यात आला आहे. आता खात्यातील सर्व बदल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन केल्या जातील, यामुळे कर्मचारी आनंदित आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाने पत्रक काढून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केलय.
सार्वजनिक आरोग्य खात्यातील बदल्यासंदर्भात शासनाने मोठा बदल केलाय. बदल्यांमध्ये आता अर्थपूर्ण व्यवहार होणार नाहीत, अशी व्यवस्था केली आहे. यामुळे वर्ग अ मधील ७३ टक्के अधिकाऱ्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली मिळाली, तर वर्ग ब मधील ८६ टक्के अधिकाऱ्यांना हव्या त्या ठिकाणी बदली मिळालीय. यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे मानले.
आरोग्य विभागाने वर्ग अ,ब,क पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी नवीन प्रणाली लागू केली आहे. या बदल्या प्राधान्यक्रम देऊन होतायत. ज्या कर्मचाऱ्यांची बदली होणार त्यांच्यांकडून दहा ठिकाणे मागवण्यात आली. हे सर्व काम ऑनलाइन पद्धतीने झाले. तसेच बदल्यांचे अधिकार मंत्रालयात एकवटण्याऐवजी विभागीय पातळीवर आयुक्तांना देण्यात आले. बदली करताना ज्येष्ठतेचा निकषदेखील लावण्यात आलाय, यामुळे बहुतेक अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या पर्यायाच्या ठिकाणीच बदली मिळाली. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
न्यूज अन कट प्रतिनिधी- अनिल खळदकर