मुंबई १९ जून २०२३: शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाच्या नेत्या, विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा विकास होत आहे. मला देखील विकासामध्ये सामील व्हायचे होते, म्हणून त्यासाठी मी आज निर्णय घेतला आणि या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला आहे. लगेचच मनिषा कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आलीय.
कायंदे पुढे बोलताना म्हणाल्या, मी अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात आहे. परंतु मला या सत्तांतरानंतरच्या
काळात कधीही संधी देण्यात आली नाही, अनेक ठिकाणी मला डावलले जात होते, अनेक कामे मला करायची होती, त्यासाठी मी संधी मागत होते. परंतू ती संधी मला उद्धव ठाकरे यांनी दिली नाही, असे मनिषा कायंदे म्हणाल्या. अनेक लोक टीका करत आहेत, कचरा म्हणून उल्लेख करत आहेत. परंतु माजी पर्यावरण मंत्र्यांना मी सांगू इच्छिते की, या कचऱ्यातूनच वीज निर्मिती होते, मोठी ऊर्जा ही निर्माण होते, असे म्हणत मनिषा कायंदे यांनी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली.
महाराष्ट्रात महिलांचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न मी या ठिकाणी मार्गी लावणार आहे. महिलांसाठी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती मी पार पाडण्यासाठी तयार आहे. महिलांच्या, युवकांच्या प्रश्नांसाठी मी कायम आवाज उठवत राहीन, असेही मनिषा कायंदे म्हणाल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर