मुंबई २० जून २०२३: शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (१९ जून) महाराष्ट्रात जोरदार राजकीय फटकेबाजी पहायला मिळाली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्धापन दिनाचे दोन मेळावे पहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपापल्या गटाच्या सभेला संबोधित करताना एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी ठाकरे गटावर हल्ला चढवला तसेच ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ दोनच वेळा मंत्रालयात गेले. त्यांनी दोन वर्षांमध्ये जेवढ्या फाईलवर सह्या केल्या नसतील तेवढ्या कामांच्या मंजुरीच्या फायलींवर सह्या मी एका दिवसात केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या गळ्याचा पट्टा डॉक्टर शिंदे यांनी काढल्याची घणाघाती टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली
बाळासाहेब ठाकरे यांनी चहावाला, टपरीवाला, रिक्षावाला असे सामान्य कार्यकर्ते बरोबर घेऊन शिवसेना मोठी केली. परंतु आता बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती करून बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली होती आणि तेच आम्हाला गद्दार म्हणून हिणवत आहेत. ती चूक आम्ही सुधारली राम मंदिर, ३७० कलम हटवण्यासारखे धडाडीचे निर्णय घेणाऱ्यांबरोबर आम्ही युती केली. ते आम्हाला कचरा म्हणतात. परंतु कचऱ्यातूनच ऊर्जा निर्मिती होते हे सांगण्याची गरज नाही असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
त्यांना कोणीतरी सांगावे की त्यांनी त्यांचा स्क्रिप्ट रायटर बदलावा. आमच्यावर टीका करणाऱ्यांना आम्ही आमच्या कामातून उत्तर देतो. तर करतो, आणतो, देतो हे नको आहे. म्हणून आम्ही जनतेला गतिमान सरकार दिले. हे काम करणारे सरकार आहे. तर हे रिक्षाची हेटाळणी करत होते. रिक्षावाला म्हणून हिणवत होते. मात्र याच रिक्षाने तुमच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातले अशी घणाघाती टीका शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली. ही सर्व सामान्य माणसाची रिक्षा आहे नादी लागू नका असा इशाराही त्यांनी ठाकरे यांना यावेळी दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर