Tree Plantation in Potholes Villagers Protest: मावळ तालुक्यातील राजापुरी ते टाकवे या प्रमुख रस्त्याची अवजड वाहतुकीमुळे झालेली चाळण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या खड्ड्यांना कंटाळून अखेर नागरिकांनी मंगळवारी एक आगळंवेगळं आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये चक्क वृक्षारोपण करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
हा टाकवे-बेलज-राजपुरी जिल्हामार्ग असून, या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, कामगार आणि दुग्ध व्यावसायिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. परंतु, २०१७ नंतर टाकवे-बेलज रस्ता वगळता, राजपुरीपर्यंतच्या रस्त्यासाठी कोणताही निधी उपलब्ध झाला नसल्याने, या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे, ज्यामुळे नागरिकांना वाट काढणेही कठीण झाले आहे. टाकवे आणि आंदर मावळातील अनेक कामगार नवलाख उंबरे येथील कामावर जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात, त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजपुरी आणि बेलज परिसरात क्रशर खाणींची संख्या वाढल्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पप्पू गायकवाड, चंद्रकांत शिंदे, भाऊ शिंदे, सागर वंजारे, राहुल लोंढे, विठ्ठल लंके, सुभाष ओव्हाळ, सुभाष लंके, रवी गायकवाड, संजय शिंदे, बाजीराव लोंढे यांसह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
पप्पू गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “बेलज ते राजपुरी या रस्त्यावर डागडुजीसाठी २०१७ पासून एकदाही निधी उपलब्ध झाला नाही. अनेकवेळा मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.” तर चंद्रकांत शिंदे यांनी शासनाच्या दुर्लक्षपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “इतर ठिकाणी अनेकवेळा निधी उपलब्ध होतो, मग हा रस्ता करण्यासाठी शासनाकडे पैसे का नाहीत? तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी आम्हाला हाच मुख्य मार्ग असल्याने शासनाने हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा.” नागरिकांच्या या अनोख्या आंदोलनाने तरी प्रशासनाचे डोळे उघडतील आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे










































