पानिपत, हरियाणा २३ जून २०२३: बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट, सत्यवर्त कादियन आणि जितेंद्र किन्हा या सहा कुस्तीपटूंना आशियाई खेळ आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आता फक्त १ चाचणी द्यावी लागेल. तसेच केवळ सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये भाग घेण्यापासूनच्या सूट सोबतच, ५ ते १५ ऑगस्ट दरम्यानच्या चाचण्यांमधील विजेत्यांशी स्पर्धा करण्याचे आश्वासनही त्यांना देण्यात आलय. बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधामुळे तयारी करू शकले नसल्याने, कुस्तीपटूंनी क्रीडा मंत्रालयाला विनंती केली होती की त्यांना ऑगस्टमध्ये आशियाई खेळांच्या चाचण्यांमध्ये भाग घेण्याची परवानगी द्यावी.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या सहा कुस्तीपटूंना, आगामी स्पर्धांसाठी मोठी सूट मिळाली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पॅनेलने आगामी आशियाई खेळ आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया कमी करून सहा आंदोलक कुस्तीपटूंसाठी एकल-सामना स्पर्धा केली आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी या कुस्तीपटूंना केवळ चाचण्यांमधील विजेत्यांना पराभूत करणे आवश्यक आहे.
समितीने १५ जुलैपूर्वी आशियाई खेळांच्या चाचण्या घ्यायच्या आहेत असे सांगितले. कारण आयोजकांना सर्व भारतीय संघांचे तपशील सादर करण्याची ही अंतिम मुदत आहे. महत्वाची बाब म्हणजे बजरंग, विनेश सारख्या मातब्बर कुस्तीपटूंना यापूर्वी दुखापती टाळण्यासाठी पूर्ण चाचण्यांमधून सूट देण्यात आली होती, परंतु संगीता, सत्यव्रत आणि जितेंद्र यांना यापूर्वी कधीही अशी सूट देण्यात आली नव्हती. IOA प्राथमिक चाचण्यांनंतर १५ जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत कुस्तीपटूंची नावे ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया (OCA) कडे पाठवण्यात येतील, परंतु आंदोलक कुस्तीपटूंनी प्राथमिक चाचण्यांतील विजेत्यांना पराभूत केल्यास ते नंतर प्रवेश करू शकतात. IOA ने १६ जून रोजी ओसीएशी संपर्क साधून भारतीय कुस्ती संघाच्या नावांसह प्रवेशिका जमा करण्यासाठी १५ जुलैची अंतिम मुदत वाढवून मागितली होती. तथापि, IOA ने सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (NSFs) ३० जूनपर्यंत त्यांच्या संबंधित संघांचे तपशील प्रदान करण्यास सांगितले होते, जेणेकरून ते कोणत्याही अडचणीशिवाय ओसीएची अंतिम मुदत पूर्ण करू शकतील.
या समितीचे प्रमुख भूपेंद्र सिंह बाजवा म्हणाले की, OCA ने आम्हाला ऑगस्टमध्ये सर्व चाचण्या घेण्यास परवानगी दिली तर हरकत नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या तारखा एकमेकांशी भिडत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही स्पर्धांमध्ये केवळ पाच ते सात दिवसांचा फरक आहे. काही कुस्तीपटू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तर काही जागतिक स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. काहींना आशियाई खेळांमध्ये पदके जिंकायची आहेत तर काहींना २०२४ च्या ऑलिम्पिकसाठी जागतिक स्पर्धेत पात्र ठरायचे आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी नावे पाठवण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.