कारागृहातील कैद्यांना आता घरच्यांशी फोनवर बोलता येणार, पुण्यातील येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर पहिला उपक्रम

पुणे २३ जून २०२३: पुण्यातील येरवडा कारागृहामधील कैद्यांसाठी आता उत्साहाची बातमी आहे. येरवडा कारगृहात असणाऱ्या कैद्यांना फोनची सुविधा मिळणार आहे. त्यांना या फोनमुळे कुटुंबाशी संवाद साधता येणार आहे. प्रत्येक महिन्यातून तीन वेळा घरच्यांशी किंवा नातेवाईकांशी त्यांना फोनवर बोलता येणार आहे. अप्पर पोलिस महासंचालक कारागृह, अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड फोन सुविधेच उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र मध्ये अनेक कारागृहांमध्ये हजारो कैदी शिक्षा भोगत आहेत. या कैद्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना शेकडो किलोमीटर आटापिटा करून त्यांना भेटण्यासाठी यावे लागते. कैद्यांना भेटण्यासाठी ठरवून दिलेल्या भेटीच्या दिवशी, शेकडो नातेवाईक कारागृहाच्या गेटवर तासंतास रखडून बसलेले पाहायला मिळतात. कैदी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना, काय काय गोष्टींना सामोरे जावे लागते याची कल्पनाही न केलेली बरी.आता कारागृहात कैद्यांसाठी नवीन ही सुविधा सुरु करण्यात येणार असून येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरु झाली आहे.

कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिकेतच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून कैद्यांना महिन्यातील ३ वेळा ही सुविधा उपलब्ध असेल. प्रत्येक कॉलवर कैद्याला आपल्या घरच्यांसोबत किंवा आपल्या नातेवाइकांन सोबत १० मिनिटे बोलता येणार आहे. म्हणजेच एक कैदी महिन्यातून ३० मिनिटे आपल्या घरच्यांशी बोलू शकणार आहे. स्मार्ट कार्ड फोन सुविधा हा राज्यभरातील पहिलाच उपक्रम आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा