सातारा २५ जून २०२३: साताऱ्यासह महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून कोयना धरणाची ओळख आहे. या धरणातून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती केली जाते. शेतीच्या सिंचनासाठीही यातून पाणी सोडले जाते. त्याचबरोबर पिण्यासाठी देखील पाणी वापरतात. मात्र यावेळी जून महिना संपत आला तरी राज्यात कोठेच मुबलक प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्याचा थेट परिणाम हा धरणातील पाणी साठ्यांवर दिसत आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस न झाल्याने तेथील पाणीसाठा निच्चांकी पातळीकडे जात आहे. त्यामुळे जर या आठवड्याभरात व्यवस्थित पाऊस झाला नाही तर वीजनिर्मितीसह सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यावेळी कोयना धरणाच्या पाणी साठ्याने ऐतिहासिक पाणी पातळी गाठलीय.
कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५ टीएमसी असून आता फक्त १०.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर यातील ५ टीएमसी पाणी साठा मृत पाणीसाठा समजला जातो. पाणी पातळी घटल्याने वीजनिर्मितीचा चौथा टप्पा यापुर्वीच बंद करण्यात आला आहे. सध्या मान्सूनने सर्वत्र दडी मारली आहे. त्यामुळे पावसाने अजून ओढ दिली तर ही परिस्थिती अजूनही भयाण होऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर