गडहिंग्लज २६ जून २०२३: उदयोजक संतोष शिंदे तिहेरी मृत्यू प्रकरणी, रविवारी पोलिसांनी संशयित माजी नगरसेविका शुभदा राहुल पाटील आणि तिचा साथीदार व अमरावती कंट्रोल रूम मध्ये कार्यरत असणारा पोलिस अधिकारी राहुल श्रीधर राऊत, यांना रविवारी विजापूर येथून एलसीबीने अटक केली होती. त्यांना आज गडहिंग्लज पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या संशयितांना न्यायालयात हजर केल्याचे समजताच नागरिकांचा मोठा जमाव न्यायालयाच्या आवारात आला. या ठिकाणी संशयितांचे वकीलपत्र घेण्यास आलेल्या वकीलांसमोर त्यांनी वकीलपत्र न घेण्याबाबत घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलिसांनी संशायितांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. यानुसार काल शुभदा पाटील, राहुल राऊत यांना बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान पुणे येथील बाणेकर व पाटे यांच्याशी संबंधित व्यवहारांची देखील चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर याबाबतही निश्चित कारवाई करु, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर