मुंबई २७ जून २०२३: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने, एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. शरद पवार पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप शिंदे यांच्या कर्मचारी संघटनेच्या पॅनलचा धुव्वा उडाला. २३ जून रोजी एसटी बँकेची निवडणूक पार पडली. राज्यभरातल्या २८१ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडली होती.
या निवडणुकीतील एकतर्फी विजयानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत नथुराम गोडसेचे बॅनर्स झळकावण्यात आले. मुंबईतील कॉटन एक्स्चेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन येथे मतमोजणी झाली. प्रस्थापित कामगार संघटनांना दूर करत सदावर्ते यांच्या संघटनेने मुसंडी मारली. सदावर्ते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन्ही संघटनेने बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त मतदान घेतले.
शिवसेनेचे आमदार किरण पावसकर यांचे राष्ट्रीय कामगार सेनेचे पॅनल ७ व्या क्रमांकावर गेल्याचे दिसून आले आहे. या निवडणुकीत १९ जागांसाठी मतदान घेण्यात आले, एकूण ७ पॅनलकडून ही निवडणूक वाढवण्यात आली, १५० हुन अधिक उमेदवार उभे होते, तर ६५ हजार मतदारांपैकी, ५८ हजार मतदारांनी मतदान केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर