मुंबई, २९ जून २०२३: यंदा आषाढी एकादशी व बकरी ईदचा सण आज २९ जून या एकाच दिवशी आलाय. त्यामुळे आजच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील अनेक गावातील मुस्लिम बांधवांनी घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. पंढरपूरसह राज्यातील ४७९ गावांनी आषाढीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील या गावांत सौदार्हपूर्ण वातावरण असल्याचा संदेश जाणार आहे.
सर्वधर्मीय जनता त्यांच्या त्यांच्या देवाजवळ सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना करतात, तेंव्हा राज्यात सौदार्हपूर्ण वातावरण असावे अशी सुद्धा याचना आपापल्या देवाकडे करत यंदा एकादशी आणि बकरी ईद एकत्र आल्याने या दिवशी पशुहत्या टाळत एकोप्याचा संदेश देण्यात आलाय. राज्यातील वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूर शहर व सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील १०० गावे, मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावे व करमाळा, वैराग या शहरांनीही शुक्रवारी कुर्बानी देण्याचे ठरवले आहे.
महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील नेवासे, घोडेगाव, शेवगाव, श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी, विसापूर, मढेवडगाव, श्रीरामपूर, बेलापूर, जामखेड आदी गावातील मुस्लिम बांधवांनी तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील २१८ गावांतील मुस्लिम बांधवांनी, विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात ३३ गावे, यवतमाळचे चार तालुके, वाशिमच्या ४७ गावांनीही हा सलोख्याचा आदर्श कायम ठेवत, ईद ची कुर्बानी पुढे ढकलली आहे.
एकीकडे सोशल मीडियावरील वादग्रस्त मेसेजच्या कारणावरून राज्यात काही समाजकंटक तणाव निर्माण करत असताना, दुसरीकडे राज्यभरातील अनेक गावांमधील हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आजच्या ऐवजी ३० जून रोजी कुर्बानी देण्यात येईल, असे वेगवेगळ्या गावातील शांतता समितीच्या बैठकीतून जाहीर केले गेलंय.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे.