बुलढाणा, ७ जुलै २०२३ : समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ झालेल्या अपघातात, विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचालक संदर्भात धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव अहवालात समोर आले आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ झालेल्या अपघात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे.
समृद्धी महामार्गावर एक जुलै रोजी भीषण बस अपघात झाला. आता बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचे निष्पन्न झाले आहे. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, ड्रायव्हर शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा ३० टक्क्यांपेक्षा अधिक होते. त्यामुळे एक जुलैच्या मध्यरात्री घडलेला तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका निर्माण झाली आहे.
रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने दिलेल्या माहितीनुसार, २३ मृतदेहांचे डीएनए अहवाल समोर आले असून अद्याप दोन मृतदेहांचे अहवाल प्रलंबित आहेत. डिझेलमुळे आग लागली आणि ती वेगाने पसरली. त्यामुळे २५ बळींना बचावण्याची संधीच मिळाली नाही. फॉरेन्सिक अहवालात टायर फुटल्यामुळे अपघात झाला का याची शक्यताही तपासण्यात आली. त्यासाठी टायरच्या खुणा आणि नमुनेही तपासण्यात आले. पण, निष्कर्षावरून ही शक्यता फेटाळण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर