सोनीपत, ८ जुलै २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे सांगितले. तर काल त्यांना मानहानीच्या प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. आता याविरोधात राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. नेहमीच राजकीय वातावरणात व्यस्त असणारे राहुल गांधी यांचा आज मात्र नवीन चेहरा पाहायला मिळाला.त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेमध्ये त्यांनी समाजातील आदिवासी, कष्टकरी, नोकरदार, उद्योजक,कलाकार, शेतकरी त्याचबरोबर विविध क्षेत्रातील लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. हे चित्र फक्त यात्रे पुरतेच मर्यादित आहे का? यावरही चर्चा झाली. पण आज राहुल गांधी हरियाणातील सोनीपत मध्ये चक्क शेतामध्ये मजुरांच्या मध्ये भात लावणी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी त्यांनी शेतामध्ये ट्रॅक्टरही चालवला.
पांढरा टी-शर्ट आणि हातात भाताची रोपे घेतलेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हरियाणामधल्या सोनीपतमध्ये राहुल गांधी भाताच्या शेतात गेले. तेथे त्यांनी शेतकऱ्यांसोबत वेळ घालवला. राहुल गांधी हे शेतकऱ्यांसोबत भाताची लावणी करताना दिसले. राहुल गांधी हे ट्रॅक्टरही चालवताना यावेळी दिसले. सगळ्यांना एकजूट करायचे आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे आहे, असे म्हणत काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर