भोपाळ, १० जुलै २०२३ : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील महिला अधिकारी ज्योती मौर्य प्रकरण सध्या बरेच चर्चेत आहे. एसडीएम झाल्यावर ज्योति मौर्य दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याचा आरोप त्यांच्या पतीने केला होता. हे प्रकरण गाजत असतानाच आता असेच एक दुसरे प्रकरण समोर आले आहे. मध्य प्रदेशातील ही घटना आहे. या घटनेत महिलेऐवजी एक पुरूष आहे. अधिकारी झाल्यावर त्या पुरूषाने पहिल्या पत्नीला सोडून दुसरा विवाह केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या इसमाच्या अभ्यासासाठी त्याच्या पत्नीने इतरांच्या घरी धुणी-भांडी केली, वेळप्रसंगी मजुरीचे काम करून तिने पैसे कमावले. मात्र कमर्शिअल टॅक्स ऑफीसर बनल्यानंतर त्या पतीने पहिल्या पत्नीची साथ सोडून दुसरे लग्न केले.
सदर प्रकरण देवास जिल्ह्यातील बागली भागातील आहे. ममता नावाच्या महिलेचा विवाह कमरू याच्याशी झाला होता. दोघांनी जून २०१५ मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. कामरू पदवीधर होता, पण त्याला नोकरी मिळाली नव्हती. तेव्हा ममताने त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सांगितले. मात्र या परीक्षांचे फॉर्म आणि वह्या-पुस्तकांवर खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैस नव्हते, तेव्हा ममताने त्याच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी उचलली.पतीच्या अभ्यासासाठी ममताने इतरांकडे घरकाम केले, धुण्या-भांड्यांचीही कामे केली. दुकानात काम करून, मेहनत करून पैसे कमावले आणि पतीच्या शिक्षणासाठी पुस्तके आणि नोट्स मागवल्या. त्याद्वारे कमरूने परीक्षेची तयारी सुरू केली.
अखेर २०१९-२० मध्ये कमरू यशस्वी झाले आणि कमर्शिअल टॅक्स ऑफीसरच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली. कामासाठी ते रतलाम जिल्ह्यात होते. मात्र त्याचदरम्यान, त्यांचा जोबात येथील एका तरुणीशी संपर्क झाला आणि त्यानंतर कमरूने ममताला तिच्या माहेरी पाठवले आणि तो दुसऱ्या महिलेसोबत राहू लागला.
ममताच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर तिची कमरूशी ओळख झाली होती. दोघेही जवळपास सहा वर्षे एकत्र राहिले. तिचे पहिले लग्न १६ वर्षांपूर्वी झाले होते. मात्र लग्नाच्या अडीच वर्षानंतरच पतीचा मृत्यू झाला होता. तिला पहिल्या पतीपासून मुलगा झाला, पण काही महिन्यांपूर्वी तिचा १५ वर्षांचा मुलगाही मरण पावला. कमरू हा तिचा सासरकडचाच नातेवाईक होता. पती निधनानंतर सासरी रहात असतानाच ममता व कमरूची ओळख झाली व दोघांमध्ये प्रेम संबंध तयार झाले.
त्यावेली कमरू हा शिक्षण घेता होता. तो खूप मेहनत करत असे, पण नोकरी लागल्यावर, मोठ्या पदावर नियुक्ती झाल्यावर तो बदलला आणि जिच्यामुळे हे सगळे शक्य झाले त्या पहिल्या पत्नीला सोडून त्याने दुसरे लग्न केले. या सर्व घटनेमुळे दु:खी झालेली ममता सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत असून याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. पोटगीसाठी दरमहा १२ हजार रुपये मिळावेत अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर