छत्रपती संभाजीनगर, १२ जुलै २०२३ : महाराष्ट्रात अनेक अपघातांच्या मोठ्या बातम्या समोर येत आहेत, अशा परिस्थितीत पुन्हा एकदा एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी या हायवेवर खासगी ट्रॅव्हल्सचा हृदयद्रावक अपघात झाला होता. बसला आग लागल्याने २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस झाले नाहीत तो पर्यंत समृद्धी महामार्गावर आणखी एका प्रवासी अपघाताची बातमी समोर आली.
छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर आणखी एक प्रवासी अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचे पूर्ण नुकसान झाले. या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ११ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ९ जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील गेट क्रमांक १६ वर काल रात्री खुराणा ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. अपघाताची धडक एवढी भीषण होती की, ट्रॅव्हलरचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि अनेक प्रवासी जखमी झाले.
जिल्ह्यातील फुलंबारीजवळ मुंबई-नागपूर हाय स्पीड कॅरेजवेवर पहाटे २.३० च्या सुमारास हा अपघात झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. खासगी बस नागपूरहून पुण्याकडे जात होती, तर स्टीलचा ट्रक जालन्याहून सुरतकडे जात होता. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस पाठीमागून ट्रकला धडकली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड