पुणे, १३ जुलै २०२३ : टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारही खडबडून जागे झाले आहे. टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आता टोमॅटो खरेदी करणार आहे. देशातल्या बऱ्याच भागात टोमॅटोचे दर २०० रुपयांपर्यंत गेले आहेत. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सामान्य लोकांच्या भाजीतून टोमॅटो गायब झाले आहे. या कारणामुळेच केंद्र सरकार आता नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक महासंघाकडून टोमॅटो खरेदी करणार आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून टोमॅटो खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. खरेदी केलेले टोमॅटो दिल्ली, कोलकाता, कानपूर आणि पाटण्याच्या बाजारात विक्री होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील टोमॅटोचे दर आणखी वाढण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. मान्सून निश्चित वेळेत दाखल न झाल्यामुळे याचा उत्पादनाला फटका बसला. यामुळे टोमॅटोचे दर वाढले आहेत.
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा आणि रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. एप्रिल, मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला, त्यामध्ये अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक फळबागा त्याचबरोबर तरकारी पिके वाया गेली. त्याचबरोबर रब्बी हंगामातील सगळ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
दरवर्षी ७ ते ८ जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस देशात दाखल होतो. परंतु यंदा एक महिना मान्सून पाऊस उशिरा दाखल झाल्यामुळे त्याचा परिणाम शेतीवर अधिक झाला आहे. शेतीत भाजीपाला पिकला नसल्यामुळे बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून येते. पुढच्या काही दिवसात भाजीपाल्याचे दर कमी होतील असे सांगण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर