भोपाळ, १७ जुलै २०२३ : भोपाळ ते दिल्ली येथील निझामउद्दीन टर्मिनल धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेनंतर तातडीने ट्रेन दोन स्थानकांदरम्यान थांबविण्यात आली, प्रवाशांनी या ट्रेनच्या डब्यातून उड्या टाकल्याचे एका व्हिडीओत दिसत आहे. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्य प्रदेशच्या कुरवाई आणि कैथोरा रेल्वे स्थानकाच्यादरम्यान ही दुघर्टना घडली असल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
भोपाळहून दिल्लीला चाललेल्या वंदेभारत एक्सप्रेसच्या बॅटरी बॉक्सला मोठी आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानूसार वंदेभारत एक्सप्रेस (हबीबगंज) राणी कमलापती स्थानकातून दिल्लीला निघाल्यानंतर तिच्या एका कोचच्या बॅटरी बॉक्सला अचानक आग लागली. या आगीवर तातडीने नियंत्रण मिळविल्यानंतर पुढील प्रवासासाठी सकाळी १०.०० वाजता ही ट्रेन रवाना करण्यात आल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
वंदेभारत एक्सप्रेसच्या ( ट्रेन क्र. २०१७१) कोच क्रमांक सी- १४ च्या बॅटरीबॉक्समध्ये आग लागल्याने मोठा धुर येऊ लागताच प्रवाशांमध्ये घबराठ पसरली. ट्रेनचे फायर अलार्म वाजू लागल्याने ही ट्रेन थांबविण्यात आली. ही ट्रेन राणी कमलापती स्थानकातून हजरत निजामुद्दीन टर्मिनल, नवी दिल्ली कडे निघाली असताना ही घटना घडली. या आगीला अग्निशामक यंत्रणेद्वारे सकाळी ७.५८ वाजता विझविण्यात आली. सुदैवाने कोणलाही दुखापत झाली नाही. पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यजनसंपर्क अधिकारी राहूल श्रीवास्तव यांनी एएनआय वृत्तसंस्थेला ही माहीती दिली.
या डब्यात जवळपास २० ते २२ प्रवासी प्रवास करीत होते. त्यांनी घाबरुन या गाडीतून उड्या मारल्या त्यांना नंतर दुसऱ्या कोचमध्ये पाठवण्यात आले. सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास सी-१२ कोचमध्ये आग लागल्याचे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मध्यप्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील कुरवाई आणि कैथोरा स्थानकादरम्यान तिला तातडीने थांबविण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर