जालना, १८ जुलै २०२३ : जिल्हा परिषदांच्या शाळांविषयी उच्चनभ्रू वर्गा बरोबरच मध्यमवर्गीयांमध्ये आजच्या काळात मानसिकता बदललेली दिसून येते. सरकारी शाळा, अंगणवाड्यांकडे पाहण्याचा कल काही पालकांचा वेगळा आहे. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचे पाहायला मिळते. पालक आपल्या पाल्यांना मोठमोठ्या खासगी शाळांमध्ये शिक्षणासाठी प्रवेश देतात. पण जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा जो आत्मा असतो तो सहजासहज कळत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांची असणारी आत्मीयता अतोनात असते. आपल्या विद्यार्थ्याने शिकून खूप मोठा अधिकारी व्हावे, अशी या शिक्षकांची इच्छा असते. जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मेहनत घेतात. पण जिल्हा परिषद शाळा आणि अंगणावाड्यांबाबत काही पालकांच्या मनात शंका असते. त्यामुळे ते लाखो रुपये खर्चून पाल्याला खासगी शाळांमध्ये प्रवेश देतात. पण अशाच पालकांच्या डोक्यात लक्ख प्रकाश टाकणारी घटना समोर आली आहे.
जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी वर्षा मीना यांनी एक नवा आदर्श पालकांच्यासमोर उभा केला आहे. वर्षा मीना या आयएएस अधिकारी आहेत. तसेच त्यांचे पतीदेखी आयएएस अधिकारी आहे. असे असताना वर्षा मीना यांनी आपल्या पाल्याला शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत प्रवेश दिला आहे. त्यामुळे जालन्यात वर्षा मीना यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वर्षा मीना यांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देत त्यांनी इतर पालकांना देखील आपल्या पाल्यांना अंगणावाडी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे सध्याच्या घडीला प्रत्येक पालकांना इंग्लिश मिडीयम शाळेचे वावडे आहे. त्यातूनही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची मुले ही इंग्रजी किंवा खाजगी संस्थाच्या शाळेत शिक्षण घेत असतात. प्रत्येक पालकाचा इंग्लिश स्कुलचा हट्ट असतो. मात्र या सर्वांना अपवाद ठरत जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना यांनी स्वत: चा मुलगा अथर्व याला थेट जालन्यातील दरेगाव येथील अंगणवाडीत प्रवेश दिला. वर्षा मीना यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी अनिल : खळदकर