नाशिक, २० जुलै २०२३: बाजारात कांद्याचा पुरवठा व्यवस्थित सुरू राहावा, म्हणून केंद्र सरकारने विशेष दक्षता बाळगण्यास आतापासून सुरुवात केली आहे. काढणीनंतरच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी लासलगाव येथील, भाभा अणुसंशोधन केंद्रांत ७०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया केल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली.
केंद्र सरकार नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे कांद्यावर किरणोत्सर्ग विकिरण प्रक्रियेचे काम करत आहे. येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आवाक्याबाहेर जाऊ शकतील, ही शक्यता लक्षात घेत सरकारने कांद्यावरच प्रथम इरेडिएशन तंत्रज्ञानाची चाचणी सुरू केली आहे. त्यातून कांद्याचे शेल्फ लाइफ वाढविण्यावर भर दिला जात असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली.
तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या कोल्ड स्टोअरेजचे काम लासलगावला प्रगतीपथावर असून, तेथेही कांदा साठवला जाणार आहे. कोणत्याही खाद्यपदार्थ किंवा पाकीटबंद वस्तू गॅमा किरण आणि क्ष-किरणांच्या इलेक्ट्रॉन रेडिएशनमध्ये येण्याला विकिरण म्हणतात. इरेडिएशन प्रक्रियेमुळे कांद्याला अंकुर येत नाहीत. त्यांची सडण्याची शक्यता कमी होते आणि कांद्याची टिकवण क्षमता वाढते. यालाच विकिरण तंत्रज्ञान असे म्हणतात.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर