नवी दिल्ली, २१ जुलै २०२३ : राहुल गांधीच्या मानहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकार आणि पूर्णेश मोदी यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी आता ४ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. मानहानीच्या प्रकरणात सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत त्यांची खासदारकी रद्द केली आहे. आता या निकालामुळे लोकसभेच्या कामकाजात सहभागी होता येत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे.
न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होतेय. यावेळी राहुल गांधी यांच्यावतीने अॅड. अभिषेक मनु सिंघवी यांनी तर तक्रारदारांच्यावतीने अॅड. महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली आहे. सिंघवी यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, या निर्णयाने राहुल गांधींचे संसदेतील कामाचे अनेक दिवस वाया गेले तसेच आत्ता सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनातही राहुल गांधींना सहभागी होता येत नसल्याने लवकरात लवकर पुढील सुनावणीची मागणी केली.
लोकसभा अधिवेशन ११ ऑगस्टला संपत आहे आणि लवकरच वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही घोषित होऊ शकते, असंही अॅड.सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलं. यानंतर अॅड. जेठमलानी यांनी याचिकेवर उत्तर देण्यासाठी १० दिवसांचा वेळ मागितला. यावर न्यायमूर्ती गवई यांनी उच्च न्यायालयाने शेकडो पानांचा निकाल दिलेला असताना नव्याने उत्तर देण्याची काय गरज आहे असा प्रश्न विचारला आहे.
तर या प्रश्नावर उत्तर देताना महेश जेठमलानी यांनी त्यांना सर्वोच्च न्यायालयासमोर काही कायदेशीर बाबी ठेवायच्या असल्याचं सांगितलं. यावेळी सिंघवी यांनी लोकसभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहता येत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाला राहुल गांधींच्या निलंबनात अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने तक्रारदारांची पहिली सुनावणी झाल्याशिवाय अंतरिम दिलासा देता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.
कर्नाटकमधील निवडणुकांच्या प्रचारादरम्यान एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी मोदी आडनावासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर सुरत कोर्टाने दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या सभेत म्हटलं होतं की, सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का आहे? यावर भाजपचे नेते पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत त्यांच्या विरोधात सुरत कोर्टात तक्रार दाखल केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे