रायगड, २३ जुलै २०२३ : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू झाली असुन ७८ लोक अद्याप बेपत्ता आहेत. आज घटनेचा चौथा दिवस आहे. परिसरात दुर्गंधी असल्याने बचावकार्यात मोठी अडचण होत आहे. पावसामुळे रायगडमध्ये आता अलर्ट जारी करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे पाऊस, खराब प्रकाश आणि खराब हवामानामुळे शोध आणि बचाव कार्य थांबवण्यात आले होते. ते आज म्हणजेच रविवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले आहे. दुसरीकडे, शनिवारी पाच मृतदेहांपैकी ४ मृतदेहांची ओळख पटली, तर इतरांची ओळख पटू शकली नाही.
मुंबईपासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील डोंगरावर असलेल्या, इर्शाळवाडी आदिवासी गावात बुधवारी रात्री भूस्खलन झाले. या गावातील ४८ पैकी किमान १७ घरे पूर्णपणे किंवा अंशत: ढिगाऱ्याखाली गाडली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्गम गावात पक्का रस्ता नसल्याने माती हलवणारी उपकरणे तिथे सहज नेता येत नाहीत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड