मुंबई, २८ जुलै २०२३ : गेल्या १५ दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई आणि ठाण्यात तर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक धरणे तुडूंब भरून वाहू लागली आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या विहार आणि तानसापाठोपाठ मोडक सागर धरण ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर तलाव काल रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मोडक सागर धरणाची पाणी पातळी १६३.१५ टीएचडी एवढी असून हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. दरम्यान, मुंबईला पाणी पुरवठा करणारी काही धरणे भरली असली तरी अजूनही इतर धरणे भरणे बाकी आहे. गेल्यावर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १२७७७८७ दक्षलक्ष लिटर पाणीसाठा होता. आज हा साठा ८९१२४७ दशलक्ष लिटर एवढा आहे. मात्र, येत्या काळात पाणी साठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आतापर्यंत मुंबईला पाणी पुरवठा करणारे चार तलाव ओसंडून वाहत आहेत. तुळशी तलाव २० जुलै रोजी मध्यरात्री १ वाजून २५ मिनिटांनी भरून वाहू लागला होता. तर विहार तलाव २७ जुलै रोजी रात्री १२ वाजून ४८ मिनिटांनी वाहू लागला होता. तानसा तलावही २६ जुलै रोजी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला होता. गेल्याच आठवड्यात तुळशी तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता, त्यापाठोपाठ परिसरातील मोठ्या पावसामुळे तानसा आणि विहार हे दोन्ही तलाव देखील पूर्णपणे भरले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर