बंगळुरु, १ ऑगस्ट २०२३ : चांद्रयान ३ मोहिमेतील अवघड टप्पा मंगळवारी रात्री पार पडला. १४ जुलैपासून सुरु झालेल्या चांद्रयान ३ मोहिमेतील एक महत्त्वाच मॅन्यूव्हर होते. चांद्रयान ३ ने ट्रान्सलुनार ऑरबिटमध्ये प्रवेश केला आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास चांद्रयान ३ ने पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. पृथ्वी आणि चंद्र या दोघांच्या कक्षेमधील भागाला ट्रान्सलुनार ऑरबिट म्हणतात. चांद्रयान ३ ने अजून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलेला नाही. फक्त ते आता चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे.आतापर्यंत चांद्रयान ३ पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत होते. त्यावेळी टप्याटप्याने चांद्रयान ३ चा कक्षा विस्तार करण्यात आला.आता यानाचा पुढचा स्टॉप चंद्र असेल, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या चांद्रयान ३ मोहिमेत सर्व शेड्युलनुसार चालू आहे. यानाच आरोग्य व्यवस्थित आहेत. ५ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान ३ ला चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्याचे नियोजन आहे. १ ऑगस्टच्या रात्री १२ ते १२.३० दरम्यान इस्रोकडून हे मॅन्यूव्हर पार पडले.
प्रॉप्लजन मॉड्युलमध्ये असलेल्या चांद्रयान ३ चे वजन २१४५ किलो आहे. यात विक्रम लँडर आणि रोव्हर आहे. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर प्रॉप्लजन मॉड्युलपासून लँडर वेगळा होणार आहे. चांद्रयान ३ ला ट्रान्सलुनार ऑरबिटमध्ये पोहोचवण्यासाठी यानाला गती देणे आवश्यक होते. त्यासाठी ठराविक वेळेमध्ये चांद्रयान ३ चे इंजिन प्रज्वलित करण्यात आले.
चांद्रयान ३ येत्या ५ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर इस्रो पृथ्वीवरुनच वेगवेगळे मॅन्यूव्हर करणार आहे. चांद्रयान ३ ला चंद्राच्या अपेक्षित १०० किमीच्या सर्क्युलर ऑरबिटमध्ये स्थापित करण्याच लक्ष्य आहे. चंद्राच्या कक्षेत चांद्रयान ३ वर इस्रोकडून चार मॅन्यूव्हर करण्यात येतील.१४ जुलैला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन चांद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. एलव्हीएम ३ रॉकेटने चांद्रयान ३ ला अपेक्षित कक्षेत स्थापित केले होते. आता चांद्रयान ३ पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर