उत्तराखंड, ४ ऑगस्ट २०२३ : उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेच्या मार्गावर असलेल्या गौरीकुंडजवळ गुरुवारी मध्यरात्री दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. येथील एका ठिकाणी मध्यरात्री दरड कोसळण्याने पायथ्याची दुकाने प्रभावित झाली. या दुर्घटनेत नेपाळमधील नागरिकांसह बाराजण बेपत्ता झाले असून, शोधमोहीम सुरू असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केदार खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. जवळच्या टेकटीवरुन मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा आणि दगड कोसळत खाली असलेल्या दुकांनावर पडले आहे. घटनेनंतर बेपत्ता लोकांचा शोध आणि सुटका करण्यासाठी स्थानिक लोक, पोलीस आणि एसडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले. मात्र सातत्याने दरड कोसळलत असल्याने बचावकार्य थांबवण्यात आले होते.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दलीप सिंह राजविर यांनी बोलताना सांगितले की, मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने तीन दुकाने प्रभावित झाले आहेत. त्यानंतर घटनास्थळी शोधमोहीम तात्काळ सुरू करण्यात आली असून, सुमारे १०-१२ लोक तिथे असल्याचे सांगण्यात आले आहे. पण अजूनही कोणी सापडले नाहीत. शोधमोहीम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर