औरंगाबाद, ५ ऑगस्ट २०२३ : राज्यात बहुतांश भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरीही लगबगीने आपल्या शेती कामाला लागला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमी पाऊस असतानाही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. अशातच शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खतांमुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले तर काही ठिकाणी पिके चांगल्या स्थितीत आहेत. अशातच आता औरंगाबाद जिल्ह्यात लासुर स्टेशन येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात एकीकडे शेतकरी युरिया खताच्या तुटवड्याचा सामना करत आहेत. तर दुसरीकडे आता युरिया खताचा मोठा काळाबाजार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरिया खताच्या काळाबाजारामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शंका आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर स्टेशन येथून हजारो गोण्या युरिया खत भारताबाहेर गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लासुर स्टेशन येथून भिवंडी आणि भिवंडीतून युरिया खत भारताबाहेर गेल्याची शक्यता आहे.
भारतातून काळ्याबाजारात गेलेल्या खताचा देश-विघातक कृत्यासाठी वापर होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. निफाड पोलिसांच्या कारवाईनंतर धक्कादायक कृत्य उघड झाले आहे. साडेपाचशे गोण्या युरिया खत जप्त केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लासूर स्टेशन येथील दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर