नवी दिल्ली १६ ऑगस्ट २०२३ : पुण्यात एका कार्यक्रमासाठी अजित पवार आणि शरद पवार हे पक्ष फुटीनंतर पहिल्यांदच एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अजित पवार यांनी शरद पवार यांना भेटणे टाळले होते. मात्र त्यानंतर व्यावसायिक अतुल चोरडीया यांच्या घरी अजित पवार यांनी गुप्त भेट घेतली. त्यानंतर आतापर्यंत या भेटीवरून उलट सुलट चर्चा होत आहेत. पवार काका पुतण्यांच्या भेटीवरून महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. याचदरम्यान अजित पवार यांनी कोल्हापुरात ध्वजारोहणानंतर त्या भेटीवर भाष्य केले आहे. आपण ती भेट घेतली मात्र त्या गाडीमध्ये मी नव्हतोच असे अजित पवार म्हणाले.
अजितदादा १२ ऑगस्टला चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले होते. तर शरद पवार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट च्या कार्यक्रमासाठी पुण्यात होते. दुपारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शरद पवार आणि अजित पवार यांची उद्योजक अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट झाली. परंतु ही भेट माध्यमांच्या नजरेपासून लपून राहिले नाही. संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास शरद पवार यांची गाडी बाहेर पडली. त्यांनी थांबून प्रसिद्धी माध्यमांकडेही पाहिले आणि निघून गेले.
त्यानंतर पावणेसहाच्या सुमारास एक काळ्या कलरची गाडी बाहेर पडली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी दादा झोपून गेल्याचे पाहिले. गाडी सुसाट पुढे गेल्यावर ही गाडी गेटला धडकली आणि नंतर चालकाने गाडी मागे घेऊन ती बाहेर काढली आणि निघून गेली. यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले मी त्या गाडीत नव्हतोच तर त्या गाडीतून उतरणार कसा. मी बैठकीला गेलो होतो हे मान्य करतोय. परंतु ज्या गाडीचा अपघात झाला ती गाडी माझी नव्हतीच असे अजित पवार म्हणाले आहे.
मी लपून गेलेलो नाही. हे जे काय चाललंय ना, मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला काय लपून जायचे कारण आहे. तुम्ही मला लपून गेलेले कुठे बघितले असा उलट प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींना अजित पवार यांनी यावेळी केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर