पुणे, १९ ऑगस्ट २०२३ : गेल्या महिना दीड महिन्यापासून टोमॅटोचे भाव महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर गगनाला बीडले होते. त्यामुळे केंद्र सरकारही खडबडून जागे झाले होते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधून यावर पर्याय शोधण्यासाठी सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून टोमॅटो खरेदी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. सध्या महाराष्ट्रात टोमॅटोचे दर उतरत असल्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मागील कित्येक दिवसांपासून सर्वसामान्य लोकांच्या ताटातून टोमॅटो हद्दपार झाला होता.देशभर टोमॅटोचे दर २०० रुपये किलोच्या पलिकडे गेल्यानंतर लोकांनी टोमॅटो खाणे बंद केले. सध्या सगळ्याच पालेभाज्यांची बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दरही कमी झाले आहेत. अशातच आता टोमॅटोचे उत्पादन वाढल्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे टोमॅटोचे दरही सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आले आहेत.
राज्याच्या अनेक भागात हीच परिस्थिती दिसून येते. वाशिमच्या भाजी बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोचा दर घसरले आहेत.सध्या ८० रुपये प्रति किलोने टोमॅटो विकला जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोने २०० रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला होता. मात्र सद्यस्थितीत टोमॅटोचे दर सामान्यांच्या आवाक्यात आल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे ग्राहकांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र याचा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे.
सध्या सर्वत्रच मालाची आवक वाढल्यामुळे बाजारात बाजार भाव गडगडल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. कांद्याचा बाजार भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा बाजार आणला जात आहे. परंतु कांद्याची आवक वाढल्याने ४०% भाव कोसळले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. ४२ हजार पिशव्यांची मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक झाली आहे. त्यामुळे ३० ते ३२ रुपये कांद्याला दर मिळत होता. सध्या तोच दर १७ ते २२ रुपयापर्यंत खाली आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर