पुणे, २८ ऑगस्ट २०२३ : प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू नेहमी त्यांच्या बेधडक आणि सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात. बच्चू कडू यांच्या विधानांमुळे अनेकदा त्यांच्या मित्रपक्षांचीही पंचाईत झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे बच्चू कडूंची राजकीय टोलेबाजी ही नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. पण आता बच्चू कडू थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस बजावण्याच्या तयारीत आहेत.
बच्चू कडूंच्या राजकीय धोरणांची माध्यमांमध्ये कायमच चर्चा असते. पण आता थेट भारतरत्न सचिन तेंडुलकरलाच ते नोटीस पाठवणार असल्यामुळे त्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असताना त्याला नोटीस संदर्भात खुद्द बच्चू कडू यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. भारतरत्न असणाऱ्या माणसाने कोणत्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरुणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडले जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करू, भारतरत्न सचिन तेंडुलकरला आम्ही नोटीस पाठवणार असल्याचे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे. याबाबत वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना या विषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही ३० तारखेला सचिन तेंडुलकर यांना नोटीस पाठवणार आहोत. त्यांना आम्ही ३० तारखेपर्यंत वेळ दिला होता. तोपर्यंत त्यांनी यासंदर्भात त्यांची कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आम्ही वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवणार असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून वाहिन्यांवर चालणाऱ्या काही विशिष्ट उत्पादनांच्या जाहिरातींवरून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यामध्ये पान-गुटखा, तंबाकू, पानमसाला, ऑनलाईन गेमिंग अशा अनेक गोष्टींच्या जाहिरातींचा समावेश आहे. या जाहिराती चित्रपटसृष्टी व क्रीडा क्षेत्रातील काही मान्यवर करताना दिसत आहेत. त्यावरून अनेक वादही निर्माण झाले. खुद्द सचिन तेंडुलकरनं आपल्या वडिलांना वचन दिल्यामुळे आपण आजपर्यंत पानमसाला, गुटखा, तंबाकू यांच्या जाहिराती केल्या नसल्याचं जाहीरपणे म्हटलं आहे तरीही त्याने केलेल्या एका जाहिरातीवरून बच्चू कडू संतप्त झाले आहेत. त्याने ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. या जाहिरातीलाच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा विरोध आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे