LPG सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त? उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच मिळणार लाभ

पुणे, २९ ऑगस्ट २०२३ : मोदी सरकार येत्या काही दिवसांत एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करू शकते. एलपीजी सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, त्याचा लाभ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांपुरता मर्यादित असण्याची शक्यता आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सरकार लवकरच सिलिंडरवर २०० रुपयांचे अतिरिक्त अनुदान जाहीर करणार आहे.

सरकारच्या या निर्णयाला आगामी निवडणुकांशीही जोडले जात आहे. यंदा देशातील राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. २०२४ च्या सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत महागाई हा मोठा निवडणुकीचा मुद्दा बनू शकतो. त्याचबरोबर स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींबाबत विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.

मार्चपासून सिलिंडरच्या दरात बदल झालेला नाही
सध्या, देशांतर्गत घरगुती एलपीजी सिलिंडरची (१४.२ किलो) किंमत सुमारे ११०० रुपये आहे. दिल्लीत त्याची किंमत ११०३ रुपये, मुंबईत ११०२.५० रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये आणि कोलकातामध्ये ११२९ रुपये आहे. मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही. तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वारंवार चढ-उतार होत आहेत. १ ऑगस्टपासून व्यावसायिक सिलिंडरच्या (१९ किलो) किमती कायम आहेत. सध्या देशात १९ किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत १६८० रुपये आहे. मात्र, दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई आली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही देशात दीर्घकाळापासून स्थिर आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा