ठाणे, ९ सप्टेंबर २०२३ : केमिकल घेऊन जाणारा टँकर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपासवर पलटी झालाय. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर टँकर रोडवरुन बाजूला असलेल्या नाल्यांमध्ये पलटी होऊन अपघात झाला. टेक्नोवा कंपनीचे केमिकल एक्सपर्ट, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, मुंब्रा पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी ०१ फायर वाहन, १ वाॅटर टँकर व १ रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी पोचून तात्काळ बचावकार्य सुरू केले. यामध्ये वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे.
मुंब्रा बायपास रोड, चनी पाडा, कौसा, ठाणे या ठिकाणी वन साईड ढाबा जवळ ठाण्याकडून मुंब्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा टँकर अपघातग्रस्त झाला. टाटा टँकर एमएच ०४ इवाय ९१३४ हा टँकर आरती फार्मा यांच्या मालकीचा असून, ब्रिजेश सरोळ असे चालकांचे नाव आहे. भोईसर ते जालना या मार्गाने हा टँकर चालला होता. या टँकरमधून २५ टन सल्फ्युरिक ऍसिड हे केमिकल घेऊन जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर टँकर पलटी झाला. यामध्ये चालकाच्या डाव्या हाताला आणि कमरेला तसेच चेहऱ्याला दुखापत झाली आहे. सदरचा अपघात झाल्याने मुंब्रा-ठाणे रोडवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. टँकर पलटी झाल्याने या ठिकाणी टँकर मधून केमिकलचा धूर व उग्र वास येत होता.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर