आनंदाच्या शिध्यासंदर्भात शासनाचा घोळ सुरूच, गरिबांची दिवाळी गोड होणार कधी ?

धाराशिव, ९ नोव्हेंबर २०२३ : महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने आनंदाचा शिधा प्रत्येक सणाला वितरित करण्यात येतो. यावर्षीच्या शिध्यामध्ये हरभरा डाळ अर्धा किलो, साखर एक किलो, खाद्यतेल एक किलो, रवा अर्धा किलो, मैदा अर्धा किलो व पोहे अर्धा किलो असे साहित्य शंभर रुपयांमध्ये स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत आहे.

पूर्वी याच लाभार्थ्यांना हरभरा डाळ, रवा, साखर व खाद्यतेल प्रत्येकी एक किलो देण्यात येत होत्या. त्यासाठी शंभर रुपयेच आकारले गेले होते. मात्र यावर्षी यामध्ये मैदा अर्धा किलो पोहे अर्धा किलो या दोन वस्तूंचा समावेश केलेला आहे. सरकार गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा वाटप करीत असले तरी दिवाळी सण सुरू झाला असून अद्यापपर्यंत शासनाने वितरित करण्यासाठी ज्या वस्तू निवडलेल्या आहेत. त्या वस्तू जर शासकीय गोदामामध्ये अद्यापपर्यंत उपलब्ध नाहीत.

या वस्तू गोदामामध्ये येणार कधी ? त्यानंतर त्या वस्तू संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे पुरवठा होणार कधी ? तोपर्यंत दिवाळी सण संपलेला असेल. मग गरिबांची दिवाळी गोड होणार तरी कशी असा एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील अशीच अवस्था झाल्यामुळे दिवाळीचा शिधा चक्क दिवाळी संपल्यानंतर, दुसऱ्या महिन्यामध्ये स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरित करण्यात आला होता. त्यामुळे शासनाने तात्काळ सर्व वस्तू गाव स्तरावरील स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करून गोरगरिबांची दिवाळी गोड करावी अशी नागरिकांमधून मागणी होऊ लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा