गवा शिरल्याने साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील आसू गावच्या परिसरात भीतीचे वातावर

15

फलटण, सातारा २४ नोव्हेंबर २०२३ : काल गुरुवारी सकाळी जंगली रान गवा शिरल्याने साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील आसू गावच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सकाळी बारामती हद्दीतून नीरा नदी मार्गे ह्या रानगव्याने सातारा जिल्ह्याच्या आसू गावच्या हद्दीत प्रवेश केला. लोकांच्या गोंधळामुळे तसेच शेतकऱ्यांनी हुसकावल्याने हा गवा या भागातील अनेक शेतांमध्ये पळत सुटला. दुपारी अडीच नंतर हा गवा सातारा जिल्ह्याची हद्द पार करून तो सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचला. त्यानंतर सातारा वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले.

रान गव्याने या भागात असलेल्या अनेक शेतांमध्ये पळापळ केली. शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये जात धिंगाणा घातला, परंतु जागरूक शेतकऱ्यांनी त्याला हुसकावले. त्या रानगव्याच्या पळण्याची गती इतकी होती की शेतकऱ्यांची पळता भुई थोडी झाली.

सध्या या भागात कॅनलला पाणी आल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत आहेत. हा पट्टा ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शेतकरी ऊसाला पाणी देण्यासाठी शेतामध्ये थांबत आहेत. आज सकाळी ग़वा आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरतात अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था व घबराट निर्माण झाली होती.

आसू गावचे पोलीस पाटील अशोक गोडसे यांनी संबंधित वन विभागाला गव्याची माहिती सकाळी अकरा वाजता कळवली होती, परंतु वनविभागाचे अधिकारी या भागाकडे लवकर फिरकलेच नाहीत. आसू येथील माळीमळा नावाच्या शिवारात गव्याने काही वेळ दहशत माजवली, नंतर तो सातारा जिल्ह्याची हद्द पार करून माळशिरस तालुका, सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत पोहोचल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. वनविभागाच्या या गैरजबाबदारपणा मुळे शेतकऱ्यांचा संताप पहायला मिळाला. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित फलटण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी करावी, अशी चर्चा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : आनंद पवार