मराठी साहित्य संमेलनातील कविकट्ट्यांसाठी 20 डिसेंबरपर्यत कविता पाठवण्याचे आवाहन, कविकट्टा नियोजनाबाबत बैठक

साने गुरुजी साहित्य नगरी-अमळनेर, जळगाव २५ नोव्हेंबर २०२३ : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनातील लोकप्रिय कविकट्टा हा उपकम साहित्य संमेलनात दोन दिवस आयोजित केलेला आहे. कविकट्टा व्यासपीठावर कविता सादरीकरणासाठी स्वरचित कविता मागविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नवोदित तसेच प्रस्थापित कवींना यामध्ये सहभागी होता येईल. या संमेलनासाठी आलेल्या कवितांपैकी २०० कवितांची निवड करून कवींना निमंत्रित केले जाणार आहे.

अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयात कविकट्टा नियोजनाबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी वाङ्‌मय मंडळाचे कार्यवाह नरेंद्र निकुंभ होते, तर व्यासपीठावर कविकट्टाचे प्रमुख संयोजक राजन लाखे (पुणे) मंडळाचे उपाध्यक्ष व कवीकट्टा समन्वयक रमेश पवार होते. बैठकीत कविकट्टा आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. या बैठकीस म.वा. मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, साहित्यिक प्रा.बी. एन. चौधरी, विलास पाटील, दिनेश नाईक, भाऊसाहेब देशमुख, रमेश धनगर, डॉ. कुणाल पवार, मनोहर नेरकर, शरद पाटील, सुनिता पाटील, प्रतिभा पाटील, विवेक जोशी, रत्नाकर पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, दत्तात्रय सोनवणे, रामकृष्ण पाटील, पुनम साळुंखे, आदिंची उपस्थिती होती.

कवीकट्टासाठी कविता पाठविण्यासाठी नियमावली-
कविकट्टासाठी पाठविण्यात येणारी कविता स्वरचित असावी व प्रत्येक कवीने एकच कविता पाठवावी कविता २० ओळीपेक्षा जास्त नसावी. निवड समितीने निवडलेली कविता अंतिम असेल. कवीने स्वतःचा पत्ता, दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल पानाच्या वरच्या बाजुला स्पष्ट अक्षरात लिहावा. कविता पोस्टाने पाठवितांना पाकिटावर कविकट्टा असा स्पष्ट उल्लेख असावा. कविता फक्त पोस्टाने अथवा ईमेल पाठवावी, व्हॉटसअॅपवरची कवीता स्विकारली जाणार नाही. कविता ईमेलने पाठवितांना युनिकोड फॉन्टमध्येच पाठवावी. कविता कार्यालयात पोहचण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२३ असेल. ईमेलने कविता kavikatta97amalner@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी. तसेच पोस्टाने कविता या मराठी वाङ्‌मय मंडळ, नांदेडकर सभागृह, न्युप्लॉट, अमळनेर, जि, जळगांव ४२५४०१ येथे पाठवाव्यात असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राजन लाखे (कविकट्टा प्रमुख) ९८९२६५५५२६, प्रसाद देशपांडे (समन्वयक), ९६८७६९८२७१, रमेश पवार (समन्वयक) ९४२१५९०५१ यांच्याशी संपर्क साधावा.

न्युज अनकट प्रतिनीधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा