नांदगाव, नाशिक १ डिसेंबर २०२३ : नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मंगळणे गाव येथील ग्रामसेविकेच्या विरोधात सरपंच वैशाली पवार यांनी येथील तालुका पंचायत समितीबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी (ता. १) उपोषणाच्या चौथ्या दिवशीही कुठलाच तोडगा निघालेला नव्हता. उपोषणार्थी सरपंच वैशाली या आपल्या तीन महिन्यांच्या तान्हुल्या बाळासोबत ठाण मांडून बसलेल्या असून, प्रशासनाने दखल घेतलेली नाही.
यंत्रणेला या प्रकरणात एवढे स्वारस्य कशासाठी, असा सवाल लोकशाही धडक मोर्चाचे नेते शेखर पगार यांनी प्रभारी गटविकास अधिकारी दळवी यांना विचारला आहे. ज्या ग्रामसेविके विरोधात उपोषण सुरु आहे, त्यांच्याकडे मंगळणे येथील ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार आहे. प्रभारी पदभार काढून घेता येऊ शकतो असे सांगून पगार यांनी उद्या या प्रश्नावर रास्तारोको करण्याचा इशारा दिला.
विस्तार अधिकारी विजयकुमार ढवळे यांनी मंगळणे गावाला भेट देत ग्रामस्थांचे अतिक्रमण व अन्य मुद्द्यांवर जबाब नोंदवून आपला अहवाल प्रभारी गटविकास अधिकारी दळवी यांच्याकडे सायंकाळी सुपूर्द केला. ग्रामसेविका ए. पी. आहेर या कर्तव्यावर आल्यापासूनच सतत कसूर करत आल्या आहेत. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्याही नाहीत.
त्यांनी सात ते आठ महिन्यांपासून मासिक बैठका देखील घेतलेल्या नाही. २८/०२/२०२३ ला दमबाजी करून व निलंबनाच्या धमक्या देऊन मासिक प्रोसिडिंग बुकवर पुढील चार ते पाच महिन्यांच्या आगाऊ सह्या करून घेतल्या आहेत. ग्रामसेविका स्वतः अनुपस्थित राहून व कर्तव्यात कसूर करूनही याबाबत विचारणा केली असता उलट मला सरपंचाला व इतर सदस्यांना नेहमी खोट्या प्रकरणात अडकवून कारवाई करण्याची व निलंबन करण्याच्या धमक्या देतात, असा आरोप मंगळणेच्या सरपंच वैशाली पवार यांनी केला. जोवर कारवाई होत नाही तोवर उपोषण माघे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे