मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, महापरिनिर्वाण दिनासाठी धावणार १२ स्पेशल ट्रेन्स

मुंबई, ४ डिसेंबर २०२३ : दरवर्षी ६ डिसेंबर हा बौद्ध अनुयायांसाठी मोठा दिवस असतो. यावर्षी ६ डिसेंबर हा भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भीमराव रामजी आंबेडकर) यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिवस आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. तर बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी १२ विशेष लोकल ट्रेन धावणार आहे.

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर चैत्यभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी होते. अशा परिस्थितीत आता या दिवसानिमित्त मध्य रेल्वेने देशभरातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी १२ विशेष गाड्या सोडणार असल्याची माहिती दिली आहे. मध्य रेल्वे ५ ते ६ डिसेंबरच्या मध्यरात्री दरम्यान परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल दरम्यान १२ विशेष लोकल चालवणार आहे.

मुंबईतील दादर चैत्यभूमी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित विविध ठिकाणच्या दर्शन व्यवस्थेसोबतच छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील संपूर्ण व्यवस्थाही चोख असावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी त्याचा आढावा घेतला होता. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी असलेल्या सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा