रायगड, ११ फेब्रुवारी २०२४ : मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वरील खोपोली एक्झिट जवळ एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील कठड्याला धडक देऊन लोखंडी रेलिंग तोडून तो २० फूट दरीत कोसळला. यात ट्रक मधील क्लिनर जागीच ठार झाला तर चालकाने ट्रक मधून उडी मारल्याने तोही जखमी झाला आहे.
कर्नाटक वरून ट्रक माल घेऊन अंबरनाथ कडे मुंबई पुणे एक्सप्रेसने जात असताना तो बोरघाटात खोपोली एक्झिट जवळ आला असता, त्याचे ब्रेक निकामी झाल्याने त्याने खोपोली एक्झिट जवळील लोखंडी रेलिंगला जोरदार धडक देऊन ट्रक २० फूट दरीत कोसळला. यावेळी चालकाने तत्परतेने बाहेर उडी मारल्याने तो बचावला असून क्लिनरचा ट्रक मध्ये अडकून जागीच मृत्यू झाला आहे, तर चालकाच्या कंबरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्त सामाजिक संस्थेचे सदस्य, देवदूत यंत्रणा, आयआरबी यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत, ट्रक मध्ये अडकलेल्या क्लिनरला बाहेर काढले परंतु त्याचा मृत्यू झाला होता.
न्युज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे