मंगळवेढा, १३ फेब्रुवारी २०२३ : मंगळवेढा शहरात काल श्री रिद्धी सिद्धी महागणपती मूर्ती, ५१ साधू-संतांच्या मूतींसह देवी-देवतांच्या मूतींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी कलशारोहण व ध्वजस्तंभारोहण सोहळा देखील पार पडला. पुण्याच्या ढोल-ताशा पथकासह, सनई-चौघड्याचे मंजूळ सूरात आणि विद्यार्थ्यांचा लेझीमच्या नादात श्रींच्या प्रतिकात्मक व देव देवतांच्या, साधू संतांच्या प्रतिमांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिरापासून सुवासिनींनी डोक्यावर ५१ कलश घेतले. शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक, नवरंग चौकात मिरवणुकीवर गुलाबाची पुष्पवृष्टी करण्यात आली. न्यू इंग्लिश स्कूल, नूतन मराठी विद्यालय, जवाहरलाल शाळा यांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवून वेगवेगळ्या सांस्कृतिक कला सादर केल्या. यात घोडे, लेझीम पथक, बैलगाडी, भजनी मंडळ, ढोल-ताशा, उंट, सनई-चौघडा, पारंपरिक वाद्य पथक सहभागी झाले होते.
या निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून काल सोमवारी सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान आरंभ संभारदान, दशरुणान, प्रायश्चित्त होम, शांती होम, प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्यवचन, मातृत्व पूजन, नांदी श्राध्द, आचार्यवर्णी आणि उदकशांती झाले. दुपारी १२ ते ३ भजन करण्यात आले. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंडप पूजन, देवता स्थापना, अग्नी स्थापना, जलाधिवास, ग्रहयज्ञ, शय्याधिवास, धान्याधिवास सायंपूजा आदी कार्यक्रम झाले. तसेच गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांचा भक्ती संगीत रजनी हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
शिवाय आज मंगळवारी दि. १३ फेब्रुवारीला सकाळी ७ ते ९ वाजता स्थापित देवता पूजन, प्रधान होम, सर्व देवी देवतांचे प्रधान होम, दुपारी १२ ते ३ मध्ये मंगळवेढा शहर व तालुका पुरुष भजनी मंडळाचे सादरीकरण, दुपारी ३ ते ६ प्रधान होम संत मूती स्थापना, सायंपूजा व आरती, सायंकाळी ७ ते ९.३० मध्ये बाल कीर्तनकार श्री चैतन्य महाराज राऊत यांचे कीर्तन होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : दगडू कांबळे