जालना, २१ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, जेणेकरून ग्रामीण भागातील महिला सक्षम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हास्तरीय जानकी वस्तू व प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून ग्रामीण महिला स्वयंसहायता गटाच्या वस्तूंचा प्रदर्शन व विक्री महोत्सव जुना जालना येथील घायाळ नगरातील कै. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उदघाटन आज दानवे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेच्या गरजा लक्षात घेऊन महिला बचत गटांनी मालाचे उत्पादन केल्यास गटांना आर्थिक स्वावलंबन होण्यास मदत होईल. देशाचे पंतप्रधान यांनी या महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने लखपती दीदी हा उपक्रम सुरु केला आहे. जिल्हयातील जास्तीत महिलांनी याचा लाभ घेऊन आपली वेगळी ओळख निर्माण करावी. जिल्ह्यात आज ११ महिलांच्या शेती उत्पादक कंपन्या असून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने १६२ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. त्यांना उमेद अंतर्गत आगामी कालावधीत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात यावे असं मत दानवे यांनी यावेळी व्यक्त केल आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी