हायब्रीड लोकशाही रोखण्याकरीता आंबेडकरी कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचे ‘मविआ’ च्या प्रमुख नेत्यांना आवाहन

नागपूर, २४ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात काम करणाऱ्या तळागाळातील हाडाचा कर्मठ आंबेडकरी कार्यकर्त्यांना प्रचार-प्रसार करण्यासाठी सोबत घ्यावे. असे विनम्र आवाहन रिपाईचे ज्येष्ठ लॉग मार्च नेते पॅथर ऍड. सुरेशचंद्र घाटे यांनी आयोजित परिषदेत केले.

परिषदेत ऍड. घाटे म्हणाले कि, ‘मविआ’ च्या तीनही पक्षात मोठी फुट पडली असून निवडणुक जाहीर होईपर्यंत सत्ता लोलूप पक्ष सोडतील याचा नेम नाही. भाजपाच्या पाठीमागे आरएसएसची ताकत आहे. त्यांचा राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असा सर्व स्तरावर काम करणाऱ्या यंत्रणा राबतात. बुथ वाईज कार्यकर्त्यांची फौज उभारून निवडणुकीच्या सर्वच यंत्रणा अहोरात्र राबतात. मविआला एकजुटीने काम करून प्रशिक्षित कार्यकत्यांची मोठी फौज उभी करणे अपरिहार्य झाले आहे. त्यांना सामान्य लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न घेऊन राबणारा आंबेडकरी कार्यकर्त्यांची साथ मिळाल्यास त्याचा फायदा विजयश्री खेचून आणण्यात होईल, असे ऍड. घाटे यांनी प्रतिपादन केले.

मोदी सरकारच्या ई.डी., सी.बी.आय., एन.आय. ना पोलिस कोठया किंवा जेलची भिती आंबेडकरी कार्यकर्त्यांना आहे. ते बलिदानाचे कफन कपाळाला बांधूनच काम करतात. स्वाभिमान त्यांचा रक्ता-रक्ता भिनलेला आहे. नेते विकले गेले पण कार्यकर्ता बरबाद होऊन त्यांनी आंबेडकरी विचारांशी गद्दारी केलेली नाही. भ्रष्ट व सत्तालोलुप राजकारण्यांचा विश्वासघाती प्रतापाने सामान्य जनता कमालीची संतापलेली आहे. दररोज निघणारे लोकशाहीचे धिंडवडे, खालच्या स्तरातील शिवीगाळ, सावली देणाऱ्या वृक्षांच्या फांदयांचीच छाटणी हे अघोरी कामे पाहून प्रामाणिक कार्यकर्ते भाजपा विरोधात पेटत असल्याचेही ऍड. घाटे म्हणाले.

‘मविआ’ तील तीनही घटक पक्षांना या ना त्या कारणांनी मदत केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सन १९६६ ला शिवसेनेचे बाल्य अवस्थेत ऍड. लिलाधर ढाके यांच्या नेतृत्वात ‘लुंगी छोडो, पुंगी बजाव’ अभियानात विदर्भाचे मुंबईत स्थिरावलेले आंबेडकरी कार्यकर्ते सन १९७२ पर्यंत मोठया प्रमाणात सक्रिय होते. सन १९८५ च्या विजनवासात मंत्रालया समोरील बंगल्यात शरद पवार राहत असतांना त्यांचा त्यावेळेस त्यांचे लहान मोठे काम करणारे डबक चाळ, एलफिस्टन रोड येथील कार्यकर्ता राजु पवार यांच्या सोबतीने नागपुरचे बबन लव्हात्रे, ऍड. सुरेश घाटे, भिमराव नाईक त्यांचा हौसला कायम ठेवण्यास साथ देत.

रामदास आठवले व प्रा. जोगेन्द्र कवाडे यांना सोडल्यास सामान्य कार्यकर्त्यांना मंडळ महामंडळ पद ना प्रतिष्ठा ना अन्य कमाईचे साधन मिळाले. तरीपण भाजपा सत्तेत न येण्याकरीता कार्यकर्त्यांनी नोहमीच प्रयत्न केल्याचे नमुद केले. आंबेडकरी समाजाचे रामदास आठवले मोदी भक्त झालेत. प्रा. कवाडे एकनाथ शिंदेच्या गळयाला लागले तर डॉ. छोटु गवई ना तळयात ना मळयात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या राजकारणात सद्यस्थितीत केंद्रीय स्थानी आले आहेत. गेल्या १ वर्षापासुन मोदी विरोधात लोकशाही व संविधान बचावचा घोष करून भाजपाच्या पराभवाकरीता ताकत लावत असल्याने आधीच आरएसएस विरोधात असलेली आंबेडकरी जनता मोठया आस्थेने त्यांच्याकडे बघत आहे. मविआच्या तीनही गटांनी ऍड. प्रकाश आंबेडकरांना सामावून घेण्याची गरज झालेली आहे. त्याप्रमाणे मविआच्या प्रमुख नेत्यांनीही त्यांना साद देऊन बैठकीमध्ये पाचारण केलेले आहे.

ऍड. प्रकाश आंबेडकर या ना त्या करणांनी मविआच्या नेत्यांना घाम गाळण्यास लावत असल्याने ऍड. प्रकाश आंबेडकरांना आलेली सुवर्ण संधी ते वाया घालवित आहेत का असा? संभ्रम आंबेडकरी समाजात निर्माण झाला आहे. ऍड. प्रकाश आंबेडकरांना ही पुरेपुर जाणीव आहे कि आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचे व जीवन मरणाच्या हजारो समस्या व प्रश्न आहेत. एक एक प्रश्नाचे निराकरण करण्याकरीता रस्त्यावरचे किती लढे लढावे लागते, श्रम आणि वेळ किती जातो व कार्यकर्ता नुसताच भरडला जातो व त्याचा परिवार उघडयावर येतो. कार्यकर्त्यांना व समाजाला ही सुगीचे दिवस येतील यात शंका नाही. ऍड. प्रकाश आंबेडकरांनी संधीचे सोने करावे ही अपेक्षा.

आरपीआय व बीएसपीच्या गटा-गटातील राजकारणामुळे कोणाचेच पाय कोणाच्या पाय-पोशात दिसत नाही. अख्ख्या ब्राम्हण समाजाला एकसंघ ठेवीत ओबीसी समाजातील लोकांनाही आपल्या दावणीला बांधणाऱ्या ‘आरएसएस’ सारखी यंत्रणा उभारता येईल का ? यादृष्टीने आंबेडकरी समाजातील लेखक, लेखिका, कवि, विचारवंत, बुध्दीजीवी, साहित्यिक, नाटय कलाकार, निर्माते, कार्यकर्ते, पगारदार, रिटायर्ड लोकं, डॉक्टयर, इंजिनियर, विविध सामाजिक संघटना, संस्था आदींना विचार विमर्श करण्याकरीता मार्चच्या शेवटच्या आठवडयात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवडयात नागपूरात मध्यवर्ती ठिकाणी आयोजित ‘गोलमेज परिषद’ मध्ये पाचारण करण्यात येणार आहे. तद्वतच केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याकरीता इतरही संघटनेंची साथ घेत ईव्हीएम मशिन हटाव, अपयशी ठरलेले पक्षांतर बंदी कायदा लक्षात घेत राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी व राजकीय उमेदवारांच्या चारित्र्य व कामाची तपासणी करण्याकरीता लोकप्रतिनिधी मूल्यांकन स्वायत्त यंत्रणा, ईडब्ल्युएसच्या कोटयात एससी, एसटी, ओबीसी गरीबांचा समावेश आदी करीता आंदोलने उभारण्यात येणार असल्याचे परिषदेमध्ये म्हटले आहे. याकरीता संबंधितांना मो. नं. ९०४९६७०४२७ वर संपर्क साधावा किंवा यशवंत स्टेडियम स्थित ‘कास्ट्राईब कार्यालय’ मध्ये दुपारी ३ नंतर संपर्क साधण्याचे आवाहन ऍड. घाटे यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा