आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

सातारा १७ मार्च २०२४ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, निवडणूक कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे हे बंधनकारक आहे. सर्व यंत्रणांनी कुठल्याही प्रकारे आचारसंहीता भंग होण्याचा प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी शहरी, ग्रामीण सर्व परिसरात सार्वजनिक ठिकाणांवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या प्रतिमा व इतर अनुषंगिक बाबी जाहिरात फलक, बॅनर्स, झेंडे या व इतर माध्यमातून प्रसारीत केलेल्या असतील तर त्या सर्व काढून घ्याव्यात. आयोगाने आचारसंहिता पालन करण्याबाबत निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करावे.

तसेच नियमानुसार प्रचार कार्यक्रमांसाठी परवानगी घेणे उमेदवार, पक्षांना बंधनकारक आहे. अशा परवानगीसाठी विहीत मुदतीत संबंधितांनी अर्ज करणे तसेच कार्यक्रम नियमांचे पालन करून घेणे बंधनकारक आहे, त्याप्रमाणे संबंधितांकडून नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देशित करून जिल्हाधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व नोडल अधिकारी आणि संबंधितांनी गांभिर्यपुर्वक सोपवलेली जबाबदारी पार पाडणे बंधनकारक असून जे अधिकारी, कर्मचारी कामामध्ये हयगय करतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा