नागपूर : नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाला. या हल्ल्यात जोशी आणि त्यांचे कुटुंब थोडक्यात बचावले आहे. रात्री साडेबाराच्या आसपास महापौर संदीप जोशींवर हल्ला झाला.
नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केली आहे. विधानपरिषदेत नियम २८९ अन्वये विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य अनिल सोले, रामदास आंबटकर यांनी नियम २८९ अन्वये हा विषय मांडला होता. तर विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे महापौरच असुरक्षित असतील तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित केला होता.
जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने ते निवडक मित्रांसह आऊटर रिंग रोडवरील रस रंजन धाब्यावर जेवायला गेले होते. परत येत असताना जोशी यांच्या फॉर्च्युनर कारवर बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी जोशींच्या कारवर ३ गोळ्या झाडल्या. मात्र यात कुणालाही इजा झाली नाही. गेल्या १२ दिवसांपासून महापौर संदीप जोशी यांना धमकीची पत्रं येत होती. त्याचाच संबंध या हल्ल्याशी आहे का? याचा शोध पोलीस घेतायत. या गोळीबाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.