“पुणे पोस्ट ऑफिस मार्फत परदेशात पोहोचला १५३०० किलो दिवाळी फराळ”

पुणे ३१ ऑक्टोबर २०२४ : परदेशातील स्नेही आणि नातेवाईकांना दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेता यावा म्हणून, पुणे टपाल विभागाने ‘फराळाचे पदार्थ’ दिल्यानंतर ते अत्यंत माफक दरात परदेशात पाठविण्याची सोय केली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी आपल्या परदेशस्थ नातेवाईक, मित्र मैत्रिणींना सुमारे १५३०० किलो दिवाळी फराळ ‘पुणे टपाल विभागा’च्या विविध पोस्ट ऑफिस मार्फत पाठविल्यामुळे पुणे टपाल विभागाला विक्रमी रुपये १ कोटी पेक्षाही अधिक उत्पन्नाचा लाभ झाला आहे. पुणे टपाल क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल श्री रामचंद्र जायभाये यांनी या अनोख्या प्रतिसादाबद्दल सर्व पुणेकरांचे आभार व्यक्त केले आहेत आणि सर्व पुणेकरांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या सेवेबद्दल बोलताना पुणे टपाल क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल श्री रामचंद्र जायभाये यांनी, “ज्या नागरिकांनी अजूनही या सुविधेचा लाभ घेतला नाही अशा नागरिकांनी आपल्या परदेशस्थ नातेवाईक, मित्र मैत्रिणींना दिवाळी फराळ, भेटवस्तू पुणे टपाल विभागाच्या या खात्रीशीर सेवेमार्फत पाठवून परदेशातील मंडळींची दिवाळी आनंदाची करावी” असे आवाहन केले आहे. या सेवेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, “पुणे शहरातील सर्व टपाल कार्यालयांमधून दिवाळी फराळ परदेशामध्ये पाठविण्याची तसेच फराळाचे पॅकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. टपाल विभागाने मागील वर्षीदेखील पुण्यातून अनेक देशांमध्ये अगदी वेळेत आपल्या प्रियजनापर्यंत फराळ आणि भेटवस्तू पाठविण्याचा विक्रम केला आहे. पुणे शहरातील जि.पी.ओ., पुणे शहर मुख्य पोस्ट ऑफिस, चिंचवड ईस्ट, मार्केट यार्ड ,पर्वती व इतर मोठ्या पोस्ट ऑफीसेस मध्ये फराळाच्या पदार्थांच्या बॉक्सचे पॅकिंग करण्यासाठी उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याद्वारे काही मिनिटांमध्ये फराळ आणि भेटवस्तूंचे पॅकिंग करून हा बॉक्स लगेचच परदेशात पाठविला जात आहे.”

या संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले की; “कस्टम्स डिक्लरेशन फॉर्म मध्ये HSN कोड योग्यरित्या भरणे आवश्यक आहे. दिवाळीच्या फराळ पार्सलमध्ये कपडे आणि इतर वस्तूंसारख्या अतिरिक्त वस्तूंचा समावेश असल्यास, त्यांचे तपशील, HSN कोड आणि मूल्य या गोष्टी प्रत्येक वस्तूसाठी स्वतंत्रपणे घोषित करणे आवश्यक आहे जेणेकरून सीमाशुल्क मंजुरीदरम्यान बाहेरच्या देशात कोणताही विलंब होणार नाही.” या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना टपाल कार्यालयात जाण्याची देखील आवश्यकता नाही. ज्यांना आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून टपाल कार्यालयात येणे शक्य नाही अशा सर्व नागरिकांच्या घरून फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा पुणे टपाल विभागाने विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी पुणेकरांनी ९८३४४८२१०५ व ७०२८००७२३५ या क्रमांकावर सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संपर्क करावा.” असे आवाहन पुणे टपाल विभागाकडून करण्यात आलंय.

न्यूज अनकट पुणे प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा