२८ जानेवारी २०२५ मुंबई : राज्य परिवहन म्हणजेच (एसटी) महामंडळाच्या स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार याप्रमाणे येणाऱ्या ५ वर्षात तब्बल २५ हजार नवीन लाल परी बस महामंडळाच्या ताब्यात देण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करणार असल्याचे सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या. अशी माहिती राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन विभागाची २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीची सध्याची परिस्थिती सांगितली. सध्या महामंडळाकडे एकूण १४ हजार ३०० बस असून त्यापैकी १० हजार बस १० वर्षांपेक्षा जुन्या झाल्या आहेत. ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर पुढच्या एक ते दोन वर्षात त्यामधून प्रवासी प्रवास करणार नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता येणाऱ्या काळात एसटीकडे स्वमालकीच्या बसेस असणं आवश्यक आहे. त्यासाठी “गाव तिथे बस” याप्रमाणे दरवर्षी पाच हजार नवीन गाड्या अशा येणाऱ्या पाच वर्षात २५ हजार लाल परी घेण्याची योजना आखली असून त्यालाअर्थमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. २०२९ सालापर्यंत महामंडळाच्या ताफ्यात २५ हजार बस आणि ५ हजार एलेक्ट्रिक बस याप्रमणे ३० हजार स्वमालकीच्या बस देण्यात येणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर