पुणे 3 फेब्रुवारी 2025: पुण्यात गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी नवा आकडा समोर आल्याने पुण्यात आतापर्यंत १५८ संशयित रुग्णांची जीबीएसबाधित म्हणून नोंद झाली आहे. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात ३१ रुग्ण, समाविष्ट गावात ८३ रुग्ण, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १८ रुग्ण, ग्रामीण भागात १८ रुग्ण आणि इतर जिल्ह्यातील ८ रुग्णांचा समावेश आहे. सध्या पुण्यातील रुग्णालयांमध्ये २१ रुग्ण व्हेंटीलेटरवर असून, ४८ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
विशेषतः २० ते २९ वयोगटातील ३५ रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ० ते ९ वयोगटातील २३ आणि ५० ते ५९ वयोगटातील २५ रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. पुण्यातून आलेली ही माहिती चिंतेचे वातावरण निर्माण करणारी असली, तरी ससून रुग्णालयातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पाच रुग्णांनी जीबीएसवर मात करत रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. या रुग्णांच्या चेहऱ्यावर असलेल्या हसूने व विश्वासाने सगळ्यांना दिलासा दिला.
ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी यशस्वी उपचार व देखरेखीने या रुग्णांना पुन्हा एकदा निरोगी ठेवण्याचा मोठा प्रयत्न केला. डॉक्टर डॉ. एकनाथ पवार, डॉ. यलप्पा जाधव, डॉ. रोहिदास बोरसे, डॉ. एच. बी. प्रसाद आणि डॉ. सोनाली साळवी यांनी रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना या संकटाचा सामना करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. हे रुग्ण उपचारानंतर निरोगी होऊन घरपरतले, त्यामुळे पुणे शहरात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, १५८ रुग्णांमध्ये तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसवर मात करणारे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हे पुण्यातील आरोग्य व्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे