क्रिकेट समीक्षणातील एक तेजस्वी तारा हरवला

6

पुणे ६ फेब्रुवारी २०२५: मराठी क्रिकेटविश्वातील एक आधारस्तंभ, ज्यांनी आपल्या लेखणीने क्रिकेटला एक साहित्यिक आयाम दिला, ते म्हणजे द्वारकानाथ संझगिरी. आज त्यांच्या निधनाने मराठी क्रीडा साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

७४ वर्षीय संझगिरी यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सिव्हिल इंजिनियर असूनही क्रिकेटवर प्रेम, अभ्यास आणि अभ्यासपूर्ण लेखनाने त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. मुंबई महापालिकेत मुख्य अभियंता या पदावर कार्यरत राहूनही क्रिकेटवर लेखनाची ओढ त्यांनी सोडली नाही. १९८३ मध्ये भारताच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर ‘एकच षटकार’ हे पाक्षिक सुरू करून क्रीडा पत्रकारितेत नवा अध्याय त्यांनी लिहिला.

हर्षा भोगले व क्रीडाजगतातील शोकभावना

ज्येष्ठ क्रीडा समालोचक हर्षा भोगले यांनी संझगिरी यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले. “३८ वर्षांपासूनचा माझा मित्र हरपला. त्यांची लेखणी क्रिकेटच्या सौंदर्यस्थळांना शब्दरूप देणारी होती,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनीही संझगिरी यांचे क्रिकेटवरील असामान्य प्रभुत्व आणि शैलीबद्ध लेखन गमावल्याचे सांगितले.

४० पुस्तकांचे दैदिप्यमान योगदान

संपूर्ण क्रिकेट इतिहास, खेळाडूंच्या संघर्षगाथा, प्रवासवर्णने, सामाजिक समस्या आणि चित्रपट अशा विविध विषयांवर त्यांनी तब्बल ४० हून अधिक पुस्तकं लिहिली. १९८३ नंतरच्या सर्व क्रिकेट विश्वचषकांना त्यांनी जवळून कव्हर केले. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्यावर त्यांनी लिहिलेली पुस्तकं आजही क्रिकेटप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरतात.

संझगिरींनी क्रिकेटला दिलेले ‘साहित्यिक आयाम

मराठीत क्रिकेटवर इतक्या रसाळ शैलीत लिहिणारा लेखक विरळाच. त्यांनी खेळाला साहित्यात उंच स्थान दिलं. सोशल मीडियाच्या आधीच्या काळातही त्यांचे लिखाण वाचकांना खेळाडूंच्या मनाचा ठाव घेणारे वाटायचे. सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीवरील त्यांचे लेखन आजही लाखो वाचकांच्या स्मरणात आहे.

शुक्रवारी अंत्यसंस्कार

संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. क्रीकेटविश्वातील अनेक दिग्गज, मराठी साहित्यिक, तसेच चाहत्यांची मोठी गर्दी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. क्रीकेटचा एक श्रेष्ठ भाष्यकार हरपला, पण त्यांची शब्दसंपदा कायम स्मरणात राहील!

न्यूज अनकट प्रतिनिधी ;सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा