बदलापूर एन्काऊंटर: आई-वडिलांनी न्यायालयात घेतली अनपेक्षित भूमिका!

54

बदलापूर ६ फेब्रुवारी २०२५: बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरने एक आश्चर्यकारक वळण घेतले आहे. बनावट एन्काऊंटरच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या या प्रकरणात, शिंदेच्या आई-वडिलांनी न्यायालयात अर्ज करत सर्वांनाच धक्का दिला आहे.

न्यायालयातील धक्कादायक खुलासा

“आम्हाला ही केस लढायची नाही, आमच्यावर कोणताही दबाव नाही, पण ही धावपळ आता सहन होत नाही,” असे म्हणत शिंदेच्या आई-वडिलांनी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. अक्षय शिंदेची आई अलका अण्णा शिंदे यांनी कोर्टात आपली बाजू मांडण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने कोर्टातून लोकांना बाहेर काढून त्यांची साक्ष नोंदवली.

न्यायालयाचा कठोर प्रश्न

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने शिंदेच्या आई-वडिलांना विचारले, “तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का?” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांच्यावर कोणताही दबाव नाही, परंतु सततच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते थकले आहेत.

बनावट एन्काऊंटरचा आरोप

अक्षय शिंदेचा मृत्यू बनावट एन्काऊंटरमध्ये झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर संशय आहे. राज्य सरकारने या अधिकाऱ्यांविरोधात अहवाल देण्यास न्यायालयाला परवानगी दिली आहे.

उद्या सुनावणी

या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणार आहे. न्यायालयाचा निर्णय काय असेल आणि दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे