प्रेम कोणावर करावं, याची प्रत्येकाची उत्तरं जरी निरनिराळी असली, तरी प्रेम सर्वप्रथम स्वत:वर करावं याबाबत कोणाचंही दुमत नसावं. त्यामुळे जरी तुम्ही सिंगल असाल, तरी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशा काही भन्नाट आयडियाज, ज्यामुळे तुम्ही तुमचा ‘व्हॅलेंटाईन डे’ खास बनवू शकता.
– विश्वजीत राळे, प्रतिनिधी
फेब्रुवारी महिना सुरू झाला, की ‘व्हॅलेंटाईन डे’चे वेध लागतात. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमवीर वर्षभर या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन डे म्हणजे या प्रेमी जोडप्यांसाठी एक राष्ट्रीय सणच जणू!
मात्र हा दिवस केवळ प्रेमी युगुलांपुरता मर्यादित नसून, प्रेम व्यक्त करण्यासाठीचा आहे. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतदेखील वेगवेगळी आहे. प्रेम कोणावर करावं, याची प्रत्येकाची उत्तरं जरी निरनिराळी असली, तरी प्रेम सर्वप्रथम स्वत:वर करावं याबाबत कोणाचंही दुमत नसावं. त्यामुळे जरी तुम्ही सिंगल असाल, तरी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशा काही भन्नाट आयडियाज, ज्यामुळे तुम्ही तुमचा ‘व्हॅलेंटाईन डे’ खास बनवू शकता.
कुटुंबासोबत वेळ घालवा


आपल्याला प्रेम समजायच्याही आधीपासून ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं, त्या कुटुंबासोबतच आपण यंदाचा व्हॅलेंटाईन डे साजरा करु शकतो. कुटुंबासोबत घालवलेला वेळ, त्यांच्यासोबत घालवलेला दिवस नक्कीच सार्थकी लागेल. आपंल्या आई-वडिलांसोबत, कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत गप्पा मारा. त्यांच्यासोबत एखादा जुन्या फोटोंचा अल्बम बघा. त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जा, जेवणाचा आनंद घ्या. त्यांना एखादं गिफ्ट देऊनही तुम्ही त्यांचा आनंद द्विगुणीत करू शकता. तसेच एखादं छोटसं पत्र लिहून त्यांचे अनोख्या पद्धतानं आभारदेखील मानू शकता. यामुळे तुमच्यातील नातेसंबंध आणखी दृढ होतील.
छंद जोपासा


‘छंद करी बेधुंद’ असं छंदाचं वर्णन केलं जातं. छंद माणसाला जगायला शिकवतात, जगण्यावर प्रेम करायला शिकवतात. प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. नसेल तर त्यानं तो जोपासावा. काहींना वाचायला आवडतं, काहींना गायला आवडतं, काहींना फिरायला आवडतं… काही कवितांत रमतात, काहींना फोटोग्राफीची आवड असते, तर काहींना चित्रकलेची… मग यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला तुम्हीसुद्धा अनुभवा तुमचा छंद आणि व्हा स्वत:च्याच संगतीत बेधुंद! स्वत:सोबत घालवलेला हा वेळ तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही.
पुस्तकडेट


‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी रोमँटिक डिनर किंवा गिफ्ट्स असांयलाच हवेत, असं काही नाही. तुम्हाला जर पुस्तक वाचायला आवडत असतील, तर तुमच्या आवडत्या पुस्तकासोबत वेळ घालवून तुम्ही ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू शकता. तुमच्या आवडीचं एखादं पुस्तक घ्या आणि एका निवांत जागी किंवा एखाद्या कॅफेमध्ये जाऊन मस्तपैकी चहा-कॉफीचा आस्वाद घेत पुस्तक वाचनाचा आनंद घ्या. हा अनुभव तुम्हाला नक्कीच समृद्ध बनवेल.
मित्रांसोबत वेळ घालवा


आयुष्यातील कोणताही क्षण असोे, आनंदाचा असो वा दु:खाचा, प्रत्येक क्षणात मित्र हा असतोच. मैत्रीशिवाय खरंच जीवन निरर्थक आहे. मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा खासच असतो. मग ‘व्हॅलेंटाईन डे’ त्याला अपवाद कसा असू शकेल! मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवून यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ तुम्ही खास बनवू शकता, जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता. त्यांच्यासोेबत एखादी ट्रीप प्लॅन करू शकता, बाहेर जेवणाचा किंवा एखाद्या मूव्हीचादेखील प्लॅन करू शकता.
सोलो ट्रीप


बऱ्याच जणांना भटकायलं आवडतं. काहींना मित्र-मैत्रिणींसोबत, तर काहींना आपल्या कुटुंबासमवेत. मात्र सोलो ट्रीपचीदेखील काही वेगळीच मजा आहे. तुमच्या आवडीचं एखादं ठिकाण निवडून सोलो ट्रीपचा प्लॅन बनवा. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा. एखाद्या समुद्रकिनारी सूर्योदय किंवा सूर्यास्ताचा आनंद घ्या, एखाद्या ट्रेकचा प्लॅन करून गड-किल्ल्याला भेट द्या, आसपासच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्या. मात्र सोलो ट्रॅव्हेल करताना योग्य ती खबरदारी घ्या. एखाद्या नवीन ठिकाणी जाणार असाल, तर त्या ठिकाणची पूर्ण माहिती घ्या आणि त्यादृष्टीनं व्यवस्थित नियोजन करा.
फोटोवॉक


बऱ्याच जणांना फोटोग्राफीची हौस असते. एखादा क्षण कॅमेऱ्यात चपखलपणे टिपण्यात बऱ्याच जणांना आवडतं. तुमच्याकडे जर चांगला कॅमेरा असेल, तर तुम्ही एखाद्या फोटोवॉकला जाऊ शकता. एखादा चांगला स्मार्टफोन असला तरी हरकत नाही. तुमच्या गावा-शहरातील, किंवा त्याच्या आसपासच्या चांगल्या जागा शोधा आणि निरनिराळे क्षण, घटना, दृश्यं आपल्या कॅमेऱ्यात कैद करा.
फिल्म किंवा वेबसीरिज पाहा


घरात बसून आरामशीर व्हॅलेटाईन डे साजरा करायचाय, मग ही आयडिया खास तुमच्यासाठी! तुमच्या आवडीची एखादी फिल्म, सीरिज पाहायचा तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता, तेही घरबसल्या, अगदी स्नॅक्सचा आस्वाद घेत! बाहेर जायची इच्छा नसेल, तर हा प्लॅन उत्तम आहे. यासाठी काही खास नियोजन करण्याचीदेखील गरज नाही.
लाईव्ह इव्हेंट


‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटलं की वेगवेगळे प्लॅन केले जातात. पण जर तुम्ही सिंगल असाल आणि तुम्हाला काहीतरी हटके अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही एखाद्या लाईव्ह इव्हेंटला हजेरी लावू शकता. एखादं नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, म्युझिक कॉन्सर्ट, लाईव्ह बँड परफॉर्मन्स, ओपन माईक, स्टँडअप कॉमेडी शो इत्यादींचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.