पुणे १५ फेब्रुवारी २०२५ : पुण्यातून आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी विकेंड म्हणजे आनंदाचा काळ असला तरी, याच वेळी खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची मनमानी भाडेवाढ प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. भोसरीतील काही ट्रॅव्हल एजन्सी प्रवाशांकडून तिकीट दराच्या नावाखाली जास्तीचा पैसा उकळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनकट न्यूजच्या प्रतिनिधीने या ट्रॅव्हल एजन्सींची पाहणी केली असता धक्कादायक बाबी उघड झाल्या.
दुप्पट-तिप्पट भाडे, पण सेवा मात्र शून्य!
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, या ट्रॅव्हल्स एजन्सी विकेंडला तिकीट दरात दुप्पट-तिप्पट वाढ करतात. एका प्रवाशाने सांगितले की, “सामान्य दिवसात ५०० रुपये असलेले तिकीट विकेंडला १२०० रुपयांना मिळते. पण प्रवासाच्या सोयीसुविधा मात्र काहीच मिळत नाहीत.”
या तक्रारी इथेच थांबत नाहीत. प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. बसच्या आतली स्वच्छता, सीटची अवस्था अत्यंत वाईट असते. अनेकदा शौचालयाची सोय नसते आणि बसमध्ये दुर्गंधी पसरलेली असते. “आम्ही प्रवासाच्या सुरुवातीलाच परत फिरण्याचा विचार केला, पण पैसे आधीच घेतले होते, त्यामुळे नाइलाजाने त्रास सहन करावा लागला,” एका महिलेने सांगितले.
प्रवासात अन्नाचा गोंधळ!
प्रवासादरम्यान ट्रॅव्हल्स चालक ज्या हॉटेलमध्ये थांबतात, तिथेही प्रवाशांची लूट होते. हॉटेलमध्ये थोडे पर्याय, जास्त दर आणि निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते, असे अनेक प्रवाशांनी सांगितले. “भूक लागली होती म्हणून जेवलो, पण त्यानंतर पोटदुखी सुरू झाली,” एका प्रवाशाने आपला अनुभव सांगितला.
प्रवाशांचे आवाहन: सावध राहा, योग्य ट्रॅव्हल्स निवडा!
या सगळ्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. “आता ऑनलाइन रेटिंग आणि रिव्ह्यू पाहून ट्रॅव्हल बुक करणे महत्त्वाचे आहे. ट्रॅव्हल्सची माहिती घ्या, त्यांचे रेटिंग पाहा आणि शक्यतो सरकारी बस किंवा ओळखीच्या ट्रॅव्हल्समधून प्रवास करा,” असा सल्ला प्रवाशांनी दिला आहे.
प्रशासनाची भूमिका काय?
प्रवाशांच्या तक्रारींनंतरही स्थानिक प्रशासन किंवा प्रवासी विभागाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. “अशा मनमानी भाडेवाढीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात,” अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे