पुणे २५ फेब्रुवारी २०२५: महाशिवरात्रीच्या उपवासासाठी लागणाऱ्या रताळी आणि कवठांची मोठी आवक पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा रताळींची आवक दुपटीने वाढली असली, तरी मागणी चांगली असल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत आहेत.
रताळ्यांना सोन्याचे दिवस!
सोमवारी मार्केट यार्डात तब्बल अडीच हजार पोती रताळी दाखल झाली. सातारा जिल्ह्यातील कराड आणि मलकापूर येथील गावरान रताळींना किलोला ३५ ते ४० रुपये इतका दर मिळत आहे, जो मागील वर्षी केवळ २५ ते ३० रुपये होता. विशेषतः चवीला गोड, लहान आणि आकर्षक दिसणाऱ्या गावरान रताळींना जास्त मागणी आहे.
कर्नाटकातील बेळगाव भागातून मात्र रताळींची आवक मंदावली असून, त्यांना केवळ १५ ते २० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. वाहतूक खर्च परवडत नसल्याने तेथील शेतकरी बाजारात माल पाठवण्यास कमी प्रमाणात उत्सुक आहेत.
कवठांनाही मागणी वाढली!
महाशिवरात्रीच्या उपवासासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कवठांची देखील मोठी आवक सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांत पुरंदर, नगर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतून ३ हजार गोणी कवठ मार्केट यार्डात दाखल झाली आहे. कवठांच्या आकारानुसार त्यांना शेकड्याला ४०० ते ७०० रुपये दर मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद!
यंदा रताळी आणि कवठांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. “मागील वर्षीच्या तुलनेत रताळींची आवक दुप्पट झाली असली, तरी मागणी चांगली असल्याने दर स्थिर आहेत. हे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे,” असे अमोल घुले, माजी उपाध्यक्ष, आडते असोसिएशन, मार्केट यार्ड यांनी सांगितले.
महाशिवरात्री निमित्ताने पुणे मार्केट यार्डात चैतन्याचे वातावरण असून, ग्राहकांची गर्दी वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे पुढील काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे